फसवणुकीचे प्रकरण एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

कोल्हापूर - नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा हात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणातील आणखी तपशील येत्या दोन दिवसांत उघड होईल. प्रकरण अंगलट येण्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीला पदावरून दूर करून आपले ‘हात’ वर करण्याचे काम संबंधित पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.

कोल्हापूर - नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा हात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणातील आणखी तपशील येत्या दोन दिवसांत उघड होईल. प्रकरण अंगलट येण्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीला पदावरून दूर करून आपले ‘हात’ वर करण्याचे काम संबंधित पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. या प्रकरणाची शहर आणि परिसरात दिवसभर चर्चा रंगली होती. 

हा जिल्हाध्यक्ष कोण? आणि नेमके त्याने केले काय, या प्रकरणाच्या चर्चांना आता ऊत आला आहे. सत्तेची ऊब अनेकांना वाकड्या वाटेवर नेण्याचे काम करते. काही वर्षांपूर्वी सामान्य परिस्थितीत राहणारा हा जिल्हाध्यक्ष विलासी जीवन जगू लागला. त्याच्या राहणीमानात, वागण्या-बोलण्यात आमूलाग्र बदल झाला. याची चर्चा पक्षामध्ये आणि बाहेरही होऊ लागली. नेत्यांच्या जवळचा माणूस म्हणून त्याने वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर  त्याला प्रमुखपद मिळाले.

या कार्यकर्त्याला अल्पावधीतच पक्षाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाल्याने इतरांच्या भुवया उंचावल्या. मात्र, अचानक तडकाफडकी पक्षनेतृत्वाने त्याचा राजीनामा घेतला. वरकरणी मुदत संपली असे सांगून पक्षाकडून सारवासारव केली जात असली तरीदेखील हे प्रकरण पक्षाला चांगलेच भोवण्याची शक्‍यता असल्याचे ओळखूनच पक्षाने त्याच्याकडून राजीनामा घेतला आहे. 

एका व्यक्तीच्या मुलाला शासकीय सेवेमध्ये नोकरी लावतो, असे सांगून या जिल्हाध्यक्षाने लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांतच याबाबतचा गुन्हा दाखल होणार असून, संबंधित जिल्हाध्यक्ष हा आरोपी किंवा सहआरोपी होईल, असा पोलिसांचा संशय आहे. त्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. हे एकच प्रकरण आहे की आणखीन काही फसवणुकीचे प्रकार आहेत, याबाबतची चौकशीही सध्या वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर असताना गुन्हा दाखल झाला तर पक्षाची मोठी बदनामी होईल, या भीतीने पक्षनेतृत्वाने तातडीने राजीनामा घेतला तर आहेच; पण पदावर असताना गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी दिवसभर हालचाली करत होते. यासाठी राजकीय वजन वापरल्याचीही चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case of cheating is against the President of a national party