केबिनमध्ये घुसून खंडणी मागितली अन...

घनशाम नवाथे 
Saturday, 5 September 2020

सांगली येथील भूविकास बॅंकेचे व्यवस्थापक चंद्रकांत हणमंतराव माने (वय 56, नवजीवन सोसायटी, कुपवाड) यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पाचजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगली : येथील भूविकास बॅंकेचे व्यवस्थापक चंद्रकांत हणमंतराव माने (वय 56, नवजीवन सोसायटी, कुपवाड) यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बर्गे, पायल प्रदीप बर्गे, सुनिता प्रदीप बर्गे, वकील सुभाष संकपाळ आणि अनोळखी महिला अशा पाचजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खंडणीविरोधी पथकाने गुरूवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. 

अधिक माहिती अशी, माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, संशयित पायल बर्गे ही बॅंकेत नोकरीस आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास पायल बर्गे, प्रदीप बर्गे, सुनिता बर्गे, वकील संकपाळ आणि अनोळखी महिला असे सर्व संशयित भूविकास बॅंकेत आले. त्यावेळी सर्वजण जबरदस्तीने केबिनमध्ये घुसले.

त्यांना कशासाठी आलात अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी पायल बर्गे हिला नोकरीत बढती दिली पाहिजे. तसेच तिला पन्नास हजार रूपये पगार झाला पाहिजे असे धमकावले. तसेच दरमहा दहा हजार रूपये खंडणी प्रदीप बर्गेला द्यावी अशी मागणी केली. तेव्हा सर्वांना विरोध केला. त्यावरून वाद झाला. संशयित आणि त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली. तेव्हा बॅंकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा संशयितांनी विनयभंग केला असेही फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान व्यवस्थापक माने यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्थापन केलेल्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. पथकाने याप्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर पथकाने गुरुवारी रात्री उशीरा कारवाई केली. याप्रकरणी माने यांची फिर्याद नोंदवून घेत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीप्रकरणी प्रदीप बर्गेसह पाचजणांविरूद्ध फिर्याद दाखल झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आज उशिरापर्यंत कोणाला अटक करण्यात आली नव्हती. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against five persons including Pradip Bergen in the ransom case