जातीचे दाखले न देणाऱ्यांवर कारवाई होणार - सहारिया 

जातीचे दाखले न देणाऱ्यांवर कारवाई होणार - सहारिया 

कोल्हापूर - ""ज्यांनी आपल्या जातीचे दाखले सहा महिन्यांत दिले नाहीत, अशा राज्यातील 450 नगरसेवकांवर कायद्यानुसार कारवाई होईल,'' असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. सहारिया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. 

श्री. सहारिया म्हणाले, ""निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने जात पडताळणीचे दाखले आधीच घेऊन ठेवणे आवश्‍यक आहे. सहा महिन्यांत जात पडताळणीचे दाखले दिलेच पाहिजेत. कायद्यानुसार किंवा शासन निर्णयानुसार वेळेत हे दाखले दिले पाहिजेत. राज्यात ज्यांनी वेळेत दाखले दिलेले नाहीत, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.'' दरम्यान, ही बाब न्यायालयीन प्रक्रियेची आहे. न्यायालयातच याचा निकाल होऊ शकतो, असेही श्री. सहारिया यांनी नमूद केले. 


या वेळी अपर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. राजेश देशमुख, निवडणूक निरीक्षक अजित पवार, नंदकुमार काटकर उपस्थित होते. 

"लवकरात लवकर दाखले द्या' 
निवडणुकीच्या काळात इच्छुक उमेदवारांना जातीचे दाखले लवकरात लवकर दिले पाहिजेत, यासाठी यंत्रणा गतिमान करण्याच्या सूचनाही या वेळी सहारिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी पातळीवर त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही श्री. सहारिया यांनी दिल्या. 

"नो कॉमेंट...' 
कोल्हापुरातील 20 नगरसेवकांच्या दाखल्यांचाही त्यामध्ये समावेश आहे; मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याने न्यायालयीन प्रक्रियेवर कोणतेही भाष्य करता येणार नसल्याचेही श्री. सहारिया यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com