साप पकडणे, खेळवणे येणार अंगलट

साप पकडणे, खेळवणे येणार अंगलट

कोल्हापूर - साप पकडायचा, त्याला कसेही हाताळत फोटो काढून घ्यायचे व आपल्या धाडसीपणाचे फोटो फेसबुक, व्हॉटस्‌ॲपवरून झळकवायचे. हे आता साप पकडण्याइतकेच अंगलट येणार आहे. मुळात अनधिकृतपणे साप पकडून त्याला वाट्टेल तसे हाताळून त्याचे फोटो प्रसारित करण्याची क्रेझच निर्माण झाली आहे. साप हाताळणे हा जसा गुन्हा आहे, तसा तो जिवाला धोकाही आहे. 

त्यामुळे वन विभागातर्फे प्रशिक्षित सर्पमित्रांची नवी टीम बनवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे नाग पकडून त्याला अतिशय धोकादायक पद्धतीने हाताळण्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्या संदर्भात त्या व्यक्तीवर वन्यजीव कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. यापुढे ही कारवाई अधिकच काटेकोरपणे केली जाणार आहे. 

साप हा निसर्गाचाच एक घटक आहे. त्यामुळे जंगल, शेत, गवती कुरण, झाडी झुडपे, उंदराचे वास्तव्य असलेल्या इमारती या ठिकाणी सापांचे अस्तित्व अपरिहार्यच आहे. किंबहुना, उंदरांना भक्ष्य बनवून साप शेतकऱ्यांना मदतच करत आहे. त्यामुळे रानावनातले, शेतातले, झाडी झुडपातले साप पकडणाऱ्याच्या नादालाच लागायचे नसते; पण साप नागरी वस्तीत आला तर त्याचे काय करायचे? हा प्रश्‍नच असतो. सापाला मारणे हा गुन्हा ठरू शकतो.

या पार्श्‍वभूमीवर काही सर्पमित्र जरूर त्या ठिकाणी धाव घेतात. सापाला व्यवस्थित पकडतात व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. परंतु, काही चमको सर्पमित्र मात्र साप पकडतात. त्याला खेळवतात. साप आपल्याला काही करू शकत नाही किंवा आपण सापाला घाबरत नाही, असे दाखवण्यासाठी नागाच्या फण्याजवळ आपले तोंड नेतात. त्याला मुद्दाम डिवचतात. त्याला फुत्कारायला लावतात व हे करत असताना त्याची छायाचित्रे घेतात. चित्रीकरण करतात व ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. हे करताना अनेक तथाकथित सर्पमित्रांनी सर्पदंश व त्याचे परिणाम अनुभवले आहेत. आता मात्र अशा धोकादायक पद्धतीने अनधिकृतपणे साप हाताळण्यावर गुन्हा दाखल होणार आहे. तथाकथित सर्पमित्रांच्या शो-बाजीला झटका दिला जाणार आहे.

नागरी वस्तीत आलेला साप पकडून तो नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभाग अधिकृत सर्पमित्रांची टीम तयार करणार आहे. हे सर्पमित्र गावागावात असतील. त्याच्या रचना व कार्यपद्धतीबद्दल लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल. दरम्यान, अनधिकृत सर्पमित्रांनी साप हाताळल्यास त्याची छायाचित्रे काढल्यास कारवाई होणार हे स्पष्टच आहे. 
- क्‍लेमेंट बेन,
मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com