गुन्हेगारांनी घेतला "सीसीटीव्ही'चा धसका 

गुन्हेगारांनी घेतला "सीसीटीव्ही'चा धसका 

सातारा - गणेशोत्सवात उडत्या चालीच्या गाण्यांवर नाचायचे सोडून यादोगोपाळ पेठेतील सप्ततारा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीतील खर्चाला फाटा दिला. बचत झालेल्या निधीतून प्रमुख चौक व रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून मोटारसायकल चोरी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील संशयितांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना मदत झाली आहे. "सीसीटीव्ही' यंत्रणेमुळे रस्त्यांवरील गुन्ह्यांतही घट झाली आहे. 

सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या गणेशोत्सवात यादोगोपाळ पेठेतील सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्र समूहाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देऊन सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्चातून यादोगोपाळ पेठेत विविध ठिकाणी 11 कॅमेरे रहदारी व परिसरावर लक्ष ठेवून आहेत. 

या यंत्रणेचे सकारात्मक परिणाम समोर यायला लागले आहेत. चार दिवसांपूर्वी कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरातून पॅशन मोटारसायकल चोरीस गेली होती. या चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने शाहूपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि दुचाकी चोरणारा चोरटा रंगेहाथ पोलिसांच्या हाताला लागला. गेल्याच महिन्यात गोल मारुती परिसरातून एका महिलेच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले होते. या चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. चोरीस गेलेले हे मंगळसूत्र सांगली जिल्ह्यातून संशयिताकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांचा अधिक तपास सुरू असल्याने संशयितांची नावे समजू शकली नाहीत. नोव्हेंबर 2016 मध्ये मोटारसायकलने ठोकरल्याने मुलगा जखमी झाला होता. अपघातानंतर मोटारसायकलस्वार न थांबता पळून गेला होता. त्याचाही शोध "सीसीटीव्ही फुटेज'मुळे लागला होता. 

आजचा गणेशोत्सव निराळ्याच वळणाने निघालाय की काय, अशी स्थिती आहे. मात्र, सप्ततारा मंडळाचे संस्थापक राजू गोडसे, अध्यक्ष सचिन सावंत, सप्ततारा महिला मंडळ व बचतगट अध्यक्षा, माजी नगरसेविका दीपाली गोडसे, सप्ततारा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब उथळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनोखा पायंडा घालून दिला. लोकसहभागातून किती प्रभावीपणे लोकोपयोगी काम होऊ शकते, याचे हे आदर्श उदाहरण सांगता येईल. 

""पोलिसांकरिता गुन्हे उघडकीस आणण्याकामी सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या चोऱ्या, रस्त्यांवरील भांडण-मारामाऱ्या अशा प्रकारांनाही गेल्या काही महिन्यांमध्ये आळा बसल्याचे जाणवू लागले आहे.'' 
-राजू गोडसे, संस्थापक, सप्ततारा सांस्कृतिक मंडळ, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com