‘सीसीटीव्ही’चे वावडे का?

‘सीसीटीव्ही’चे वावडे का?

सांगली - एक मोठं खेडं असलेल्या सांगली शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली आणण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाला साफ अपयश आले आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या, वाटमाऱ्या, सोनसाखळी चोरी आणि भररस्त्यात मुडदे पडणे, हल्ले आणि छेडछाडीचे प्रकार होत असताना या यंत्रणेची गरज का वाटत नाही? असा प्रश्‍न उपस्थित होतो. बॅंका, सरकारी, निमसरकारी, सहकारी, खासगी संस्थांचे जाळे या छोट्या क्षेत्रात पसरले आहे. त्यांची मदतीने किंबहुना त्यांना सक्ती करून प्रत्येक रस्ता सीसीटीव्हीच्या नजरेत आणणे शक्‍य आहे, मात्र पोलिस प्रशासनास अजिबातच गांभीर्य नाही.

गुन्ह्यांचा आलेख कमी झाल्याचे सांगताना काही अधिकारी, संबंधित खात्याचे असतील तर मंत्री आकडेवारीनिशी फुशारकी मारताना दिसतात. ‘पूर्वी २०० गुन्हे होते आणि आता १८० आहेत’, असे चित्र मांडले जाते. पूर्वी १५० चा तपास लागला, आता १७० चा लावला, असे चित्र पुढे येत नाही. कारण, तसे घडत नाही. सांगलीपुरते बोलायचे झाल्यास खबऱ्यांचे नेटवर्क कमकुवत झाल्याचा परिणाम दिसू लागला आहे. खून सत्र, चोऱ्या, सोनसाखळी चोरी, घरफोडी, हाणामाऱ्यांचे प्रकार थांबायला तयार नाहीत.

अशावेळी शहरावर नजर ठेवण्यासाठी आणि गुन्ह्यांच्या तपासात दिशा दाखवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज सातत्याने अधोरेखित झाली आहे. तेवढी गुंतवणूक करायला पोलिस दलाकडे निधी नाही, महापालिकेला त्यात ‘रस’ वाटत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे खासगी, सरकारी, सहकारी संस्थांच्या मदतीने असे नेटवर्क उभारण्याचा पर्याय तपासून पाहिला पाहिजे. हे शक्‍य असल्याचे जिल्हा बॅंकेने दाखवून दिले आहे. 

उदाहरण द्यायचे झाल्यास सांगली-मिरज रस्त्यावर ७ पेट्रोल पंप; गाडगीळ, नानवाणी, सिद्धिविनायकसारख्या बड्या व्यापारी पेढ्या, सिझन फोर, ॲम्बॅसडर, किचली, मिरची अशी ६ मोठी हॉटेल्स, ३ मोठ्या शैक्षणिक संस्था आणि पोलिस मुख्यालय आणि मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय आहेत. या एका रस्त्यावर २० कॅमेरे सहज बसवता येतील. कोल्हापूर रस्त्यावर ढाबे व पेट्रोल पंपांची संख्या मोठी आहे. माधवनगर रस्त्यावर हॉटेल, वाहनांचे शोरूम आहेत. बासपास व आयर्विन पुलावरून सांगलीवाडी रस्त्यावर बड्या प्रस्तांचे व्यापार, उद्योग आहेत. शहराच्या अंतर्गत भागात पावलागणिक या यंत्रणा कार्यान्वित करणे शक्‍य आहे. 

हा घ्या पैशांचा हिशेब
सीसीटीव्ही संच किंमत - साधा - १५ हजार रुपये
डिजिटल संच किंमत - २२ ते २५ हजार 
संचात दोन कॅमेरे आणि डीव्हीआर हार्ड डिस्क
एक वर्ष वॉरंटी, फ्री सर्व्हिस. नंतर १० टक्के देखभाल खर्च 
डाटा राहतो - २१ दिवस (२ टीबी हार्डडिस्क)
कॅमेरे - २ मेगा पिक्‍सल
कॅमेरे - ३ व ४ मेगा पिक्‍सल, गुंतवणूक दुप्पट

पोलिसांची ‘प्रयोगशाळा’
काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिसांना चारचाकी किंवा दुचाकीवरून पेट्रोलिंग न करता सायकलवरून करावे, असे आदेश दिले. विश्रामबाग, शहरचे निरीक्षक, कर्मचारी सायकलवरून फेरफटका मारू लागले. असे चोर सापडतात का? विश्रामबागचे एक निरीक्षक चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी तो डायरीबाहेर मिटवायचा प्रस्ताव  द्यायचे, कारण काय तर गुन्ह्यांचा आलेख घटल्याचे दाखवून पाठ थोपटून घेण्याची हौस. या प्रयोगांतून परिस्थिती सुधारली नाही, उलट ती अधिक बिघडत गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com