उकिरड्यांवर आता सीसीटीव्हीचे लक्ष!

उकिरड्यांवर आता सीसीटीव्हीचे लक्ष!

सातारा पालिकेचा अभिनव उपक्रम; छायाचित्र प्रसिद्धीसह होणार दंडात्‍मक कारवाई

सातारा - सकाळी लवकर उठायचे कोणी... घंटागाडी आल्यानंतर जिना उतरायचा कधी... तिच्या मागे पळायचे कोणी... अशा एक ना अनेक कारणांची जंत्री सांगून घंटागाडीत कचरा का टाकत नाही, याचे समर्थन केले जाते. मग हा कचरा भरलेली प्लॅस्टिक पिशवी ऑफिसला जाता- जाता रस्त्याकडेच्या ओढ्यात, रिकाम्या प्लॉटमध्ये किंवा रस्त्याच्या कोपऱ्यावर भिरकावली जाते.... अशा आळशी प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी अशा अघोषित उकिरड्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. 

शहरात पूर्वीच्या ३९ वॉर्डमध्ये घंटागाडीमार्फत घर टू घर जाऊन कचरा गोळा केला जातो. कचरा कुंडीमुक्त शहर करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे. दहा वर्षे उलटून गेली तरी या चांगल्या उपक्रमाला पुरेसे यश हाती लागलेले नाही. अद्यापि २० ते ३० टक्के कचरा उघड्यावर टाकला जातो.

अर्थातच पालिकेच्या यंत्रणेला १०० टक्के दोष देणे हा कर्मचाऱ्यांवरील अन्याय ठरेल. आपल्या घरातील कचरा थेट घंटागाडीत टाकण्यात काही लोकांना कमीपणा वाटतो. आळस हा त्यातला आणखी एक भाग आहे. चौकाचौकांत दिसणारी कचऱ्याची कोंडी आता कमी झाली आहेत. मग काही कुटुंबांत निर्माण होणार कचरा नेमका जातो कोठे असा प्रश्‍न पडतो. रस्त्याकडेच्या ओढ्यांमध्ये आढळणाऱ्या कचरा भरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या पाहिल्यानंतर या प्रश्‍नाचे उत्तर सापडते. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत शहरातील काही ठराविक ठिकाणी थांबले तर घाईगडबडीत 
ऑफिसला जाताना चालत्या गाडीवरूनच कचऱ्याची पिशवी भिरकावणाऱ्या महाभागांचे दर्शन घडते. या पिशव्या केवळ ओढ्यांमध्येच नव्हे तर रिकामे प्लॉट, कोपऱ्याच्या अघोषित उकिरड्याच्या जागा याठिकाणीही आढळतात. 
अशा आळशी प्रवृत्तींना चाल लावण्यासाठी शहरातील ठराविक अघोषित उकिरड्यांवर लक्ष ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

पालिकेचे आरोग्य समितीचे सभापती वसंत लेवे यांनी याबाबत बोलताना सांगितले, ‘‘प्रायोगिक तत्त्वावर प्रभाग १८ मधून याची सुरवात करण्यात येईल. ज्या ठिकाणी कॅमेरा लावणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य होणार नाही, अशा ठिकाणी पालिकेचे कर्मचारी पहाटेपासून लक्ष ठेवून असतील. ओढ्यात किंवा इतर ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.’’ उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांची छायाचित्रे वृत्तपत्रांत, तसेच सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्‍स लावून प्रसिद्ध करण्यात येतील. त्याचबरोबर संबंधितांना नोटिसा काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. लेवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

पूर्वीचे पाढे पंचावन्न... असे घडायला नको! 
आरंभशूरतेसाठी सातारा पालिका प्रसिद्ध आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून बरेच चांगले उपक्रम राबविले जातात. मात्र, नंतर त्यामध्ये सातत्य राहात नाही. पदाधिकारी बदलतात. नवा पदाधिकारी नवीन उपक्रम घेऊन स्वत:ची छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. अधिकारी- कर्मचारीही मग जुने मोडीत काढून नव्या उपक्रमावर लक्ष केंद्रित करतात. घनकचरा उपविधी,  बायोमेट्रिक हजेरी, अतिक्रमणांची जबाबदारी भागनिरीक्षकांवर आदी अनेक चांगले उपक्रम आखले आणि सुरवातीच्या काळात राबविले गेले. नंतर मात्र या उपक्रमांची आठवण कोणालाच राहिली नाही. या उपक्रमाबाबतही ‘पूर्वीचे पाढे पंचावन्न’ असे घडायला नको, एवढीच माफक अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com