सोलापुरात बकरी ईद उत्साहात साजरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

शहरातील ईदगाह व मशिदींमधून विविध पेश-इमामांच्या मागे मुस्लिम बांधवांनी बकर ईदची विशेष नमाज आज (बुधवारी) अदा केली. नमाजानंतर एकमेकांना कडकडून भेटत त्यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

सोलापूर- शहरातील ईदगाह व मशिदींमधून विविध पेश-इमामांच्या मागे मुस्लिम बांधवांनी बकर ईदची विशेष नमाज आज (बुधवारी) अदा केली. नमाजानंतर एकमेकांना कडकडून भेटत त्यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

हजरत इब्राहिम व त्यांचे चिरंजीव हजरत इस्माईल यांनी दाखविलेल्या अतुलनीय त्यागाचे स्मरण असलेली ईद-उल-अजहा (बकरीद) उत्साहात साजरी झाली. आज पहाटेपासून ईदसाठी मुस्लिम बांधवांची लगबग सुरू होती. विशेष स्नानानंतर लहान-थोर सकाळी आठच्या सुमारास नमाजासाठी बाहेर पडले. कुटुंबातील सर्व सदस्यांसह शेजारी, गल्लीतील परिचयातील व्यक्ती असे सर्व गटागटाने ईदगाह व मशिदीच्या ठिकाणी एकत्र आले. सर्वांनी डोळ्यात सुरमा लावलेला. नमाजाच्या ठिकाणी अत्तराचा घमघमाट दरवळला. नमाजानंतर पेश-इमाम यांनी अल्लाहकडे दुवा मागितली. 

समाजात सौख्य, सौहार्द नांदावे, सुबत्ता अवतरावी, प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी दुवा मागण्यात आली. ईदी मिळणार, या कल्पनेचाही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नमाजानंतर आणखी त्यांची पावले झपाझप घराकडे पडली ती कुर्बानीसाठी. कुर्बानी दिल्यानंतर गरिबांना, नातेवाइकांना त्याचे वाटप करण्यात आले. होटगी रोड येथील ईदगाह मैदान, जुनी मिल कंपाउंड आदिलशहा ईदगाह मैदान, आसार मैदान व आलमगीर इदगाह येथे नमाज अदा करण्यात आली.

पावसामुळे पाणी साचल्याने रंगभवन येथील इदगाह मैदानावर नमाज पठण झाले नाही. त्याऐवजी परिसरातील धार्मिक स्थळांमध्ये नमाज अदा करण्यात आली. 

शिक्षणात मुली पुढे जात आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण पालकांच्या दुर्लक्षामुळे मुले शिक्षणात मागे पडल्याचे दिसून येत आहे. फेसबुक, व्हॉट्‌स ऍपमुळे शिक्षणावर परिणाम होत असून मुलांना सोशल मीडीयापासून दूर ठेवा. - अमजदअली काझी, शहर काझी, सोलापूर

Web Title: Celebrating Eid estival in Solapur