केक तोंडाला फासून विकृतीचे दर्शन

यशवंतदत्त बेंद्रे
बुधवार, 17 एप्रिल 2019

स्वास्थ्याला तडा
अनेकदा रात्री उशिरा वाढदिवस साजरे केले जातात. यामुळे सार्वजनिक शांतता तर भंग होतेच. पण, अनेकदा वाहतूकही विस्कळित होते. उत्साहाच्या भरात तरुणाईचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांकडूनही अशा युवकांना फटकारण्याऐवजी पाठीशी घालण्याचे प्रकार घडत असल्याने अशा विकृतीला अधिक बळ मिळत आहे. तर पोलिसांचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला मात्र तडा जात आहे, एवढंच...

तारळे - यापूर्वी ज्येष्ठांचे आशीर्वाद, कुटुंबीयांकडून औक्षण अशा प्रकारे साजरे होणारे वाढदिवस आता रस्त्यावर साजरे होऊ लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत, कर्णकर्कश्‍य हॉर्न व फटाक्‍यांची आतषबाजी करून, एकमेकांच्या चेहऱ्यांवर केक फासून साजरे होणारे वाढदिवस म्हणजे विकृतीचे दर्शन घडवणारे निमित्त ठरत आहे. त्याचा सामान्यांना त्रास होत असताना पोलिसांचेही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा रस्त्यावरच्या ‘बर्थ डे बॉईज’चा धीर वाढू लागला आहे. 

वाढदिवस हा जीवनातील अविस्मरणीय दिवस समजला जातो. जन्माचे सार्थक करण्याच्यादृष्टीने आणखी एक पाऊल टाकण्याचे हे निमित्त. त्यासाठी मित्रांसह आई- वडील, नातेवाईकांचे आशीर्वाद व शुभेच्छांची जोड महत्त्वाची ठरते. मात्र, आता त्यास फाटा देत वाढदिवस म्हणजे मौजमजा, सेलिब्रेशन अशी प्रवृत्ती असणाऱ्यांकडून चालणाऱ्या धांगडधिंग्याचे विकृतीत होणारे रूपांतर समाजाच्यादृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. चित्रपटातील ‘भाईचा बर्थ डे, वाजले बारा’ या गाण्याची मोठी क्रेझ तरुणांत निर्माण झाली आहे.

त्या धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी विकृत पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याचे ‘फॅड’ सध्या जोमात आहे. वाढदिवस साजरा करणारे, बर्थ डे बॉयला घेऊन एखाद्या चौकात, मुख्य रस्त्यावर जमतात. त्यांच्या दुचाक्‍या आडव्या लावतात आणि मग एका दुचाकीवर केक ठेवून तो कापला जातो. यावेळी वाहनांचे कर्णकर्कश्‍य हॉर्न व फटाक्‍यांची आतषबाजी होते. मग कापलेला केक एकमेकांच्या तोंडाला फासण्याची विकृत पद्धत मोठ्या अभिमानाने मिरवत हा युवा जोश सर्वांचा होश उडवून टाकतो. 

तारळे येथील एका चौकात काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने वाढदिवसाचा धांगडदिंगा व मस्ती झाली. अनेक पदार्थ उधळत व अतिउत्साही युवकांनी सुमारे ३० ते ४० अंडी रस्त्यावर फोडत वाढदिवस साजरा केला. त्यावर अनेकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना एक वेळ जेवणाची भ्रांत असताना उत्साही तरुणांकडून होणारी ही नासधूस कितपत योग्य आहे, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला.

सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरे करणे कायद्याने गुन्हा आहे. जमावबंदी व शांततेचा भंग करून हुल्लडबाज बर्थ डे बॉय व त्याच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- अजय गोरड, सहायक पोलिस निरीक्षक, उंब्रज पोलिस ठाणे

Web Title: Celebration Cake Mouth Confusion abnormality