कचरा डेपोच्या जागेत स्मशानभूमी? 

Cemetery in the garbage depot space?
Cemetery in the garbage depot space?

नगर : महापालिका हद्दवाढीनंतर नगर शहराचा अलीकडच्या वीस वर्षांत वेगाने विस्तार आणि लोकवस्ती वाढली; पण त्या बरोबरीने सुविधा निर्माण करण्यात महापालिका अपयशी ठरली. पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये केवळ दोनच स्मशानभूमी आहेत. त्यामुळे बोल्हेगाव, सावेडी परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक संपत बारस्कर यांच्याकडून सावेडी कचरा डेपोच्या जागेत अद्ययावत स्मशानभूमी व उद्यान व्हावे, यासाठी महापालिकेकडे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

उपनगर वाढले 
सावेडी उपनगर, केडगाव, बोल्हेगाव, कल्याण रस्ता आदी भागांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली. त्यात केडगावमध्ये एक स्मशानभूमी आहे, तर जुन्या नगर शहरासाठी नालेगाव येथेही स्मशानभूमी आहे. मात्र, सावेडी उपनगर व बोल्हेगावमध्ये स्मशानभूमी नसल्याने तेथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सावेडी उपनगरासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची गरज आहे. 

कचरा डेपो स्थलांतराचे आश्‍वासन 
शहरात दररोज 130 ते 140 टन कचरानिर्मिती होते. बुरुडगाव येथे दररोज 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू होत आहे. सावेडीतील कचरा डेपो बंद झाल्यास शहरातील सर्व कचरा प्रक्रियेसाठी बुरुडगाव येथे येणार आहे. महापालिका आयुक्‍तांनी सावेडी कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. 

प्रक्रियेसाठी जागेची शोधाशोध 
सावेडी कचरा डेपो बंद झाल्यास दररोजचा उर्वरित 30 ते 40 टन कचऱ्यावरील प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र छोट्या स्वरूपातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने सध्या महापालिका प्रशासन पर्याय शोधत आहे. त्या दृष्टीने महापालिकेने सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजी मार्केटमध्ये दररोज दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला आहे. 

महापालिकेत प्रस्ताव 
सावेडीतील कचरा डेपो जागेत अद्ययावत स्मशानभूमी व उद्यान उभे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नगरसेवक संपत बारस्कर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी आमदार निधी व महापालिका निधीतून काम व्हावे, असा प्रस्ताव महापालिकेत मांडला आहे. 

विकास आराखड्यात बदल करण्याची गरज 
महापालिकेच्या विकास आराखड्यात सावेडी कचरा डेपोसाठी 15 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्यातील दोन एकर जागा पाच वर्षांपूर्वी महापालिकेने ठराव करून महावितरणला उपकेंद्रासाठी दिली आहे. 13 एकरमध्ये सध्या खतनिर्मिती प्रकल्प व भूभरण क्षेत्र आहे. यात प्रक्रिया न होणाऱ्या कचऱ्याची संख्या अधिक आहे. त्या जागेत स्मशानभूमी व उद्यान करण्यासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात बदल करावा लागणार आहे. या बदलासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय घेणे आवश्‍यक आहे. 

सावेडी कचरा डेपोसाठी जागा द्या : बारस्कर 
नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले, ""सावेडी उपनगराला स्मशानभूमीची आवश्‍यकता आहे. नागापूरमध्ये छोटी स्मशानभूमी आहे. त्याचा उपयोग बोल्हेगाव व सावेडीला होत नाही. सावेडी कचरा डेपोची जागा स्मशानभूमीसाठी देण्यात यावी. आमदार संग्राम जगताप यांचा विकास निधी व महापालिकेच्या निधीतून या जागेत अद्ययावत स्मशानभूमी व सुंदर उद्यान होऊ शकेल.'' 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com