पत्नीस पळवून नेणाऱ्याचा भरदिवसा 'गेम' 

पत्नीस पळवून नेणाऱ्याचा भरदिवसा 'गेम' 

सांगली - पत्नीस फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून गणेश राजू रजपूत (वय 26, म्हसोबा मंदिरजवळ, आरवाडे पार्क) या सेंट्रिंग कामगाराचा डोक्‍यात दांडके घालून निर्घृण खून करण्यात आला. गोकुळनगरच्या पिछाडीस असलेल्या तात्यासाहेब मळ्याजवळील रिकाम्या पत्र्याच्या शेडमध्ये दुपारी रजपूतचा मृतदेह आढळला. 

संशयित सचिन होळीकट्टी (रा. गोकुळनगर) व साथीदाराने आज सकाळी रजपूतचे रिक्षातून अपहरण करून खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. "एलसीबी' च्या पथकाने रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतले. 

अधिक माहिती अशी, गणेश रजपूत हा सेंट्रिंग कामगार म्हणून काम करतो. आई-वडील, बहिण-भावोजी यांच्यासह तो राहत होता. गणेश आणि गोकुळनगरजवळ रिक्षा व्यवसाय करणाऱ्या सचिन होळीकट्टी यांची अनेक दिवसापासून ओळख होती. गणेशला दारूचे व्यसन होते. तसेच सचिन रिक्षा चालवण्याबरोबर घरात जुगार खेळायचा. गणेशही त्याच्याकडे जुगार खेळायला जात होता.

घरी येणेजाणे असल्यामुळे सचिनची पत्नी माधवीशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सचिन आणि माधवीला एक मुलगी व दोन मुले आहेत. सहा महिन्यापूर्वी गणेशने माधवीला फूस लावून पळवून नेले. माधवीबरोबर तिचा सहा वर्षाचा मुलगा देखील होता. पत्नी गायब झाल्याचे पाहून सचिनला गणेशचा संशय आला. सर्वत्र शोध घेऊन तो सापडला नाही. त्यामुळे त्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. 

इकडे गणेशने महिन्यानंतर सचिनच्या मुलाला सांगलीत आणून त्याच्या आजीकडे सोपवले होते. त्यानंतर तो माधवीच्या माहेरी सोलापूरला काही दिवस राहिला. तसेच गेली काही दिवस तो माधवीसह पुण्यात राहत होता. गणेशने पत्नीला पळवून नेल्यामुळे सचिन त्याच्यावर चिडून होता. तो सांगलीत कधी एकदा येतोय याची वाट पाहतच होता. गणेशचा एक ना एक दिवस काटा काढणारच असे त्याने साथीदारांना सांगितले होते. अधून-मधून तो गणेशच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडीलांकडे, बहिणीकडे, भावोजीकडे चौकशी करून धमकी देत होता. त्यामुळे सर्व कुटुंबिय घाबरले होते. गणेशचा भावोजी सर्वांना घेऊन काही दिवसापासून बसस्थानकाजवळील मुजावर प्लॉटमध्ये राहायला गेला होता. 

दरम्यान गणेश गुरूवारी (ता.20) सायंकाळी सांगलीत एकटाच आला होता. दारूच्या नशेत तो इकडे-तिकडे फिरत असताना त्याच्या मित्रांनी सचिनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. परंतू त्याने काही ऐकले नाही. सायंकाळी आईला भेटून तिच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर गोकुळनगरजवळील रेल्वे पुलाच्या परिसरातच तो फिरत होता. रात्री तो परिसरातच कोठेतरी झोपला. सकाळी उठून पुन्हा दारू पिऊन परिसरातच फिरत होता. तो आल्याची माहिती मिळाल्यानंतर सचिनने त्याचा काटा काढण्याचे निश्‍चित केले. स्वत:ची रिक्षा (क्र. 3001) बाहेर काढली. सोबत साथीदाराला घेतले. रेल्वे पुलाच्या परिसरातून 11 च्या सुमारास त्याला उचलले. हा प्रकार काहीजणांनी पाहिला. तेव्हा गणेशची "गेम' होणार? अशी शंका आली. 

गणेशचे अपहरण केल्यानंतर त्याला गोकुळनगरच्या मागे तात्यासाहेब मळा येथे रेल्वे लाईनजवळील इंद्रनील शेठ यांच्या रिकाम्या पत्र्याच्या शेडमध्ये आणले. त्याचे हात बांधून डोक्‍यात मागून दांडक्‍याने वार करून खून केला. दुपारी बारा ते एकच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश मृत होऊन त्याच्या डोक्‍यातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून दोघांनी पळ काढला. 

गणेशची गेम करण्यासाठी अपहरण केल्याची माहिती मिळताच काही मित्र त्याचा शोध घेऊ लागले. तेव्हा मळ्यातील रिकाम्या शेडमध्ये तो मृतावस्थेत पडल्याचे आढळले. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह गणेशचाच असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर, विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे आणि अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. "एलसीबी' चे पथकही तत्काळ धावले. बघ्याची गर्दीही जमली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 

मित्रांचा सल्ला धुडकावला
गणेशने सचिनच्या पत्नीला पळवून नेल्यानंतर तो अधून-मधून सांगलीत गुपचूप येत होता. तेव्हा मित्रांनी त्याला इकडे परत न येण्याच्या सल्ला दिला होता. काल सायंकाळी देखील तो दिसल्यानंतर त्याला परत जाण्याचे सांगितले. परंतू सल्ला न ऐकता तो गोकुळनगर परिसरातच फिरत होता. अखेर सचिनला माहिती मिळाल्यानंतर त्याने "गेम' केली. 

आई-बहिणीचा आक्रोश 
गणेशचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची आई आणि बहिण घटनास्थळी आली होती. दुरूनच त्यांनी गणेशचा मृतदेह पाहून टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून इतर महिलांनी दोघींना आवरले. 

"एलसीबी' कडून छडा 
खुनाची माहिती मिळाल्यानंतर "एलसीबी' चे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस पथक घटनास्थळी आले होते. त्यानी तातडीने तपासाची सुत्रे हलवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com