केंद्राच्या निवृत्तिवेतन योजनेची 'एनएसएपी'ने वाढविली गती

प्रमोद बोडके
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सोलापूर - केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची दरमहा मदत मिळण्यासाठी होणारा विलंब आता दूर झाला आहे. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या एनएसएपीच्या (नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम) माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांची रक्कम पीएफएमएसद्वारे (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम) वितरित केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ आता गतिमान पद्धतीने व पारदर्शकपणे राबविणे शक्‍य होणार आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर परिसरात या पद्धतीने लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका या प्रणालीमध्ये अव्वल आहे. तहसील कार्यालयाच्या वतीने लाभार्थ्यांच्या नावावर जमा केलेली रक्कम त्या लाभार्थ्याला काही कारणास्तव मिळत नव्हती. या प्रणालीमध्ये लाभार्थ्याला वेळेवर रक्कम मिळणे व बॅंकेतून तहसील कार्यालयाकडे परत आलेली रक्कम कोणत्या लाभार्थ्यांची आहे, याची माहिती प्रशासनाला होणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनाही येत्या काळात या प्रणालीद्वारे राबविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे.

राज्य सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा शासनाने वाढविणे आवश्‍यक आहे. 21 हजार रुपयांच्या उत्पन्नाचा दाखल मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योजना पारदर्शक होण्यासाठी आधारकार्ड लिकिंग आवश्‍यक आहे. योजनेसाठी शासनाने पुरेसे मनुष्यबळ देणे आवश्‍यक आहे.
- श्रीमंत बंडगर, सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती, उत्तर सोलापूर तालुका

आकडे बोलतात...
केंद्राच्या निवृत्तिवेतन योजनेचे महाराष्ट्राचे लाभार्थी

एकूण लाभार्थी : 11,61,072
बॅंक खातेधारक : 11,25,773
पोस्टातील खातेधारक : 34,630
मनिऑर्डर व रोखीने स्वीकारणारे : 6
पीएफएमएसकडे नोंदणी झालेले लाभार्थी : 8,86,155

Web Title: central government retirement scheme NSAP