लोकांनी सरकारवर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल जाहीर आभार - चंद्रकात पाटील

राजकुमार चाैगुले
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव व सांगली मध्येही भाजपने यश मिळविले आहे. लोकांनी सरकारवर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो, अशी प्रतिक्रीया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर - प्रत्येक निवडणूकीपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपचा पराभव होइल असे भाकित करते पण आम्ही प्रत्येक वेळेला जिंकत असतो. लोकांच्या मनात भाजप सरकार प्रती असणारा विश्‍वासच निकालातून दिसतो. यामुळेच जळगाव व सांगली मध्येही भाजपने यश मिळविले आहे. लोकांनी सरकारवर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो, अशी प्रतिक्रीया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख मुलांच्या वसतीगृहाच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप सरकार विरोधात माध्यमातून उलट सुलट भाकिते केली गेली. लोक भाजपवर नाराज असल्याचे वृत्त पसरवले गेले. पण निकाल पाहिले तर वस्तूस्थिती दिसून येईल. दोन्ही ठिकाणी निसटते नव्हे तर घवघवीत यश आम्ही मिळविले आहे. 

श्री पाटील म्हणाले, मराठा आरक्षण शासन देणारच आहे याबद्दल कोणाचेच दुमत नाही. त्यासाठी शासन बांधिल आहे. प्रसंगी न्यायालयीन लढाई ही लढू पण त्या आधी तीन योजना तळागाळापर्यंत जाणे महत्वाचे आहे. याचसाठी आमचे  वेगात प्रयत्न सुुरु आहेत. निम्या फी मध्ये अॅडमीशन, वसतीगृहाची उभारणी व दहा लाखाच्या कर्जाला व्याज अशा योजना सध्या जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांशी सुमारे अडीच तास व्हीडीओ कॉन्फरसींगवरुन चर्चा केली. यातून येत्या पंधरा दिवसात सुमारे दहा जिल्ह्यात वसतीगृहे सुरु करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

बॅंकाच्या कर्जाला सरकारने हमी देण्याचे ठरविल्याने युवकांना तातडीने विविध उद्योंगासाठी तातडीने कर्ज मिळणार आहे. 12 हजार पैकी 500 जणांना कर्ज मिळाले आहे. येत्या काही दिवसात ही संख्या पाच हजार इतकी होईल यामुळे याची व्याप्ती वाढत आहे.  या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हधिकारी व मराठा समाजातील नेते यांची संयुक्त समिती दर पंधरा दिवसांनी आढावा घेतील असे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chadrakant Patil comment on Corporation election result