कोट्यवधींची संपत्ती दान करून कुटुंब होणार संन्यस्त!

Chajed-Family
Chajed-Family

कऱ्हाड - सर्वसंग परित्याग करून एक कुटुंब लौकार्थाने नव्हे तर खऱ्या अर्थाने सन्यस्त होते आहे. आपली आयुष्यभराची चार ते पाच कोटींची पुंजी, संपत्ती, कमाई समाजाला दान करून निरपेक्ष वृत्तीने सन्यासाला निघाले आहे. येथील शनिवार पेठेतील व्यापारी विमलचंद भवरलाल छाजेड यांच्या कुटुंबाची ही आहे आगळीवेगळी कथा. ते स्वतः, पत्नी मंजू, त्यांचा मुलगा विशाल, चुलती रोशनी सन्यस्त व्रत घेत आहेत. राज्यालाच नव्हे तर कदाचित देशातही एकमेव ठरणाऱ्या या प्रसंगाने दातृत्वाचा नवा आदर्शच घालून दिला आहे. 

जैन समाजाची दीक्षा ते स्वीकारत आहेत. त्यानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वास्तविक छाजेड कुटुंब येथे व्यापारानिमित्त स्थायिक झाले. प्रवीणकुमार भवरलाल या नावाने मोठे दुकानही पंचक्रोशीत माहितीचे होते. मात्र, आठ वर्षांपूर्वी त्यांच्या घरातील मुलगा विपुल व मुलगी वनिता यांच्यासह त्यांची बहीण रुबी यांनी स्वीकारलेल्या दीक्षेचा मोठा परिणाम कुटुंबावर झाला. हळूहळू त्या दिशेने त्यांचीही वाटचाल सुरू झाली. विमलकुमार यांनी त्या कार्यासाठी झोकूनही दिले. त्यांचे बंधू नेहमीच फिरतीवर असतात. राजस्थानलाही त्यांना जावे लागत होते. त्या वेळी विमलकुमार यांना दुकानात बसावे लागत होते.

त्यामुळे अनेकदा त्या कार्यात खंड पडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हळूहळू लाखोंची उलाढाल असलेले दुकान बंद केले. त्यानंतर त्यांची सन्यस्त व्रताकडे खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली. त्यांच्या त्या कार्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली. सन्यस्त वृत्तीकडे आकर्षित झालेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. एवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी केवळ समाजाला ज्ञानार्पण करण्याचाच वसा प्रत्यक्षात घेतला.

त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशातही कधी घडणार नाही, असा प्रसंग येथे घडतो आहे, ते म्हणजे संपूर्ण कुटुंबच सन्यस्त व्रताकडे जाताना दिसते आहे. त्या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी व त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनेक जण येत आहेत. त्यांना भेटून आशीर्वाद घेत आहेत. 

येथील गुंदेशा यांच्या मैदानावर सभामंडप उभारून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. किमान चार ते पाच कोटी रुपयांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा सर्वसंग परित्याग छाजेड कुटुंब करत आहेत. पै अन्‌ पै जमवून लोक सुखाच्या मागे लागतात. लोकांना ज्ञानार्पण करण्यासाठी छाजेड कुटुंब सन्यस्त व्रत स्वीकारत आहेत. हा विरोधाभास समाजाला दिशादर्शक ठरणाराच आहे. आईच्या स्मरणार्थ त्यांनी सुमारे ११ लाखांचा निधी गोरगरीब जनतेत वाटला आहे. त्याशिवाय शहरातील प्रत्येक झोपडपट्टीत फिरून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला किमान ७०० कुपन्स दिले आहेत. तेकुपन घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला एक किट कुटुंबातर्फे दिले जात आहेत. त्यात चादर, ताट, वाटी, ग्लास, पेन, वही, पुस्तक, अर्धा किलो डाळी असे साहित्य त्या किटमध्ये होते. मातृवंदना, संचय सहवेदना, प्रभू मिलन असे विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. त्यानंतर सर्व कुटुंबच दीक्षा घेणार आहे. तो कार्यक्रम मध्य प्रदेश येथील मोहन खेडा येथे होणार आहे. तेथे जैन साधू आचार्य श्री जयानंद विजयी महाराज त्यांना दीक्षा देणार आहेत.

कुटुंबातील तिघांनी घेतली आठ वर्षांपूर्वी दीक्षा 
छाजेड कुटुंबातील विपुल, वनिता छाजेड व रुबी अशा तिघांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी दीक्षा घेतली. त्यानंतर या वेळी संपूर्ण कुटुंब दीक्षा घेत आहेत. त्यात विमलचंद यांच्यासह त्यांच्या चार नातेवाईकांचा समावेश आहे. कुटुंबानेच थेट संन्यास घेणे, ही राज्यातील एकमेव घटना मानली जात आहे. देशपातळीवरही अशा घटना झाल्या आहेत. एकाच कुटुंबांतील सर्व सदस्यांनी एकाच वेळी दीक्षा घेण्याचा प्रसंग तसा क्वचितच आल्याचे अनेक जाणकरांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com