कोल्हापूर, सांगलीत पन्नासहून अधिक ठिकाणी चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे-बंगळूर महामार्गावरील गोकूळ शिरगाव येथे चक्काजाम होते. याचवेळी सिद्धगिरी हॉस्पीटलकडे जाण्यासाठी रुग्ण असलेली मोटार तेथे आली. पुढील सीटवरील रुग्ण पाहून कार्यकर्त्यांनी मोटारीस तातडीने वाट दिली. याचवेळी निवडणूक कामासाठी जाणाऱ्या नोकरदारालाही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विनंतीनंतर वाट दिली. 

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज पुणे-बंगळूर महामार्गासह जिल्ह्यात तब्बल पन्नासहून अधिक ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले.

सकल मराठा समाजाच्यावतीने याचे आयोजन झाले. कणेरीवाडी रस्त्यावर काही तरुणांनी वेळेपूर्वीच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोलिसांनी अटकाव केला. यानंतर ते गोकूळ शिरगाव येथील कोंडूसकर पेट्रोल पंपाजवळ नियोजित असलेल्या चक्काजाम मध्ये सहभागी झाले. चक्का जाम मधून रुग्णवाहिका, परीक्षार्थींना तातडीने वाट देण्यात आली. राष्ट्रगीताने चक्काजाम आंदोलनाची सांगता झाली. 

सुमारे दोन हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रचंड फौजफौट्यात आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पुणे-बंगळूर या ठिकाणी गोकूळ शिरगाव, उजळाईवाडी, पेठवडगाव परिसरात चक्काजाम करण्यात आला. ठिकठिकाणी शंभर-दीडशे-चारशे कार्यकर्तेनी गटागटाने थांबून "एक मराठा, लाख मराठा' आशा घोषणा देत चक्काजाम केला. महामार्गावरील गोकूळ शिरगावजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास वसंत मुळीक यांच्यासह सुमारे तीन-चारशे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी दोन्हीबाजूने महामार्ग रोखला. पोलिसांच्या फौजफाट्यात सुरू असलेले आंदोलन अर्धातास सुरू राहिले. यानंतर पोलिसांनी विनंती केल्यावर तातडीने राष्ट्रगीताने चक्काजाम आंदोलनाची सांगता झाली. 

शहरात येणाऱ्या सर्व प्रवेश मार्गावरही चक्का जाम करण्यात आले. सकाळी साडेअकरा ते दुपारी बारा अशा एकच वेळ सर्व ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करून वाहतूक सुरळीत करावी लागली. शहरात शिरोली टोल नाका, शिवाजी पुल, कसबाबावडा न्याय संकुल, दसरा चौक, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आदी ठिकाणी चक्का जाम करण्यात आले. हातात भगवे झेंडे, "एक मराठा लाख मराठा" असे लिहिले टीशर्ट कार्यकर्त्यांच्या अंगावर दिसत होते. 

पुणे-बंगळूर महामार्गावरील गोकूळ शिरगाव येथे चक्काजाम होते. याचवेळी सिद्धगिरी हॉस्पीटलकडे जाण्यासाठी रुग्ण असलेली मोटार तेथे आली. पुढील सीटवरील रुग्ण पाहून कार्यकर्त्यांनी मोटारीस तातडीने वाट दिली. याचवेळी निवडणूक कामासाठी जाणाऱ्या नोकरदारालाही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विनंतीनंतर वाट दिली. 

महामार्गावर अधिक वेळ चक्का जाम होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून अर्ध्यातासात आंदोलन संपविण्याची विनंती केली होती. मात्र महामार्गावरील कणेरीमठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नियोजित वेळेपूर्वीच काही मोजकया कार्यकर्त्यांनी अचानक चक्काजाम केला. गोकूळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी त्यांना तातडीने ताब्यात घेवून नियोजित गोकूळ शिरगाव येथील आंदोलनस्थळी सोडले. 

महामार्गावर तीन-चार ठिकाणी एकाच वेळी चक्का जाम झाल्यामुळे गोकूळ शिरगाव, उजळाईवाडी, पेठवडगाव परिसरात सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत वाहने थांबून होते. ठिकठिकाणी हे आंदोलन सुरू असल्यामुळे फार रांग नसली तरीही रस्ते शांत होते. अनेक प्रवासी नातेवाईकांना, कुटुंबियांना संपर्क साधून चक्काजामची माहिती देत होते. उशिर होण्याचा निरोप देत होते.

Web Title: chakka jam agitation in kolhapur