औरंगाबाद रस्त्यावर "चक्का जाम' 

सुनिल गर्जे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

कायमस्वरूपी दोन ते तीन वाहतूक पोलिसांची गरज असताना, केवळ एक कर्मचारी कार्यरत असतो. अनेकदा तोही जागेवर थांबत नसल्याने वाहतूककोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे.

नेवासे  : नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा येथे आज वाहतूक पोलिस हजर नसल्याने तब्बल तीन तास वाहतूककोंडी झाली होती. या दरम्यान सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर दुपारपासून झालेली ही कोंडी सायंकाळी सहाच्या सुमारास फुटली नि प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

नेवासे फाटा येथे वाहतूककोंडी ही बाब आता नित्याची झाली आहे. वास्तविक, येथे कायमस्वरूपी दोन ते तीन वाहतूक पोलिसांची गरज असताना, केवळ एक कर्मचारी कार्यरत असतो. अनेकदा तोही जागेवर थांबत नसल्याने वाहतूककोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे.

अवैध प्रवासी वाहने उभी राहतात रस्त्यावर

अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने येथे सर्रास थेट रस्त्यावरच थांबतात. शिवाय, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वाहनचालक चहा-नाश्‍ता घेण्यासाठी वाहने रस्त्यालगत थांबवून हॉटेलमध्ये जातात. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह रस्त्यालगत थांबणाऱ्या वाहनांचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे. 

प्रवाशांची नाराजी
नगर-औरंगाबाद रस्त्यावर देवगड फाटा परिसरात आज अपघात झाला. त्यात आज मोठी लग्नतिथी असल्याने येथील वाहतूककोंडीत भर पडली. नेमकी गरज असताना, आज येथून वाहतूक पोलिसही गायब होते. त्यामुळे कोंडीत अडकून पडलेल्या प्रवाशांसह वाहनचालक, व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

पाेलिस निरीक्षकांशी संपर्क

साप्ताहिक सुटीवर असलेले पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांना अनेकांनी संपर्क करून वाहतूककोंडीची माहिती दिली. त्यावर डेरे यांनी, शहरातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांना तेथे पाठवून दिले. त्यानंतर कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. पोलिसांना काही स्थानिक कार्यकर्त्यांसह प्रवाशांनीही मदत केली. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत होऊ लागली. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पोलिस वाहतूक सुरळीत करण्यात व्यग्र होते. 

लवकरच उपाययाेजना ः डेरे

देवगड फाट्यावरील अपघात व मोठी लग्नसराई, यामुळे नेवासे फाटा येथे वाहतूककोंडी झाली. येथील ही समस्या सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील. 
- रणजित डेरे, पोलिस निरीक्षक, नेवासे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Chakka Jam' on Aurangabad Road