
■ 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर
■ "या भूतांनो या' या नाटकाला द्वितीय पारितोषिक
■ "चकोट घास', "या भूतांनो' या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड
■ सोलापूर शहर व जिल्ह्यातील 17 संघांनी घेतला होता स्पर्धेत सहभाग
सोलापूर : 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून, सोलापूर केंद्रातून इंडियन आर्ट ऍकॅडमी या संस्थेच्या "चकोट घास' या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तसेच, भारतीय क्रीडा शिक्षण व नाट्य मंडळ या संस्थेच्या "या भूतांनो या' या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज केली.
हेही वाचा : राज्यातील केवळ 56 कारखान्यांची धुराडी पेटली
दरम्यान, या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. अस्तित्व मेकर्स फाउंडेशन या संस्थेच्या "अर्धांगिनी' या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त मिळाले आहे. 15 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 59वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडली. यंदाच्या प्राथमिक फेरीतून सोलापुरातील सुमारे 350 कलावंतांनी रंगभूमीवर आपली सेवा सादर केली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 17 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाने आपल्या कसदार अभिनयाचे सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सतीश शेंडे, रामचंद्र शेळके, मोहन देशपांडे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा : एक रूपयाचा कडपत्ती... हे झाले बेपत्ता
प्राथमिक फेरीचा सोलापूर केंद्राचा अन्य निकाल
■ दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक : श्रीपाद येरमाळकर (नाटक - चकोट घास), द्वितीय पारितोषिक - रणधीर अभ्यंकर (नाटक - या भूतांनो या)
■ प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक - आनंद आगाशे (नाटक - जुईली मानकर), द्वितीय पारितोषिक - गणेशसिंग मरोड (नाटक - लाली)
■ नेपथ्य : प्रथम पारितोषिक - बाळकृष्ण निमसूडकर (नाटक - अंत्यकथा), द्वितीय पारितोषिक पी. सुमीत (नाटक - याचक)
■ रंगभूषा : प्रथम पारितोषिक - शांता येळंबकर (नाटक - चकोट घास), द्वितीय पारितोषिक - रमेश श्रवण (नाटक - चाफा सुगंधी)
■ उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक - रत्नाकर जाधव (नाटक - डबल डील) व अपर्णा जोशी (नाटक - या भूतांनो या)
■ अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : निशिगंधा कापरे (नाटक - चकोट घास), सुवर्णा बुरांडे (नाटक - फतवा), वैशाली बनसोडे (नाटक - लाली), वर्षा मुसळे (नाटक - अर्धांगिनी), प्रशांत कुलकर्णी (नाटक - जुईली मानकर), कौस्तुभ गोडबोले (नाटक - चाफा सुगंधी), अमोल देशमुख (नाटक - भूमिका), दत्ता वाघमारे (नाटक - काळोख देत हुंकार).