praniti shinde
praniti shinde

प्रणिती शिंदेंसमोर भाजप, एमआयएमचे आव्हान 

सोलापूर : गेल्या दोन टर्मपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला झालेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर आव्हान असेल ते माकप, भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे. या पक्षाचे उमेदवार कोण असणार त्यानुसार या मतदार संघातील निवडणुकीची गणिते ठरणार आहेत. 

2014च्या निवडणुकीत एमआयएमचे तौफिक शेख यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत सर्वांनाच धक्का दिला होता. तर भाजपच्या मोहिनी पत्की तब्बल 24 हजार मते घेऊन अनेकांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. यंदाही या मतदार संघातून भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याशिवाय नगरसेवक नागेश वल्याळ आणि पालकमंत्री विजय देशमुख यांचे सुपुत्र डॉ. किरण देशमुख यांच्या नावाची चर्चा या मतदार संघासाठी होत आहे. शिवसेनेकडून महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे दावेदार आहेत. ते भाजपमध्ये येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसे झाले तर भाजपकडून त्यांना निश्‍चितच उमेदवारी मिळेल. त्यावेळी शिवसेनेकडून पुरुषोत्तम बरडे किंवा लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची वर्णी लागेल असे संकेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्या लोलगे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. माकपकडून माजी आमदार नरसय्या आडम निश्‍चित आहे, मात्र राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस व माकपसह बहुपक्षांची आघाडी झाली तर हा मतदारसंघ कुणाला सुटणार याबाबत उत्सुकता असणार आहे. एमआयएमतर्फे पुन्हा तौफिक शेख यांनाच संधी मिळण्याची शक्‍यता. वंचित बहुजन आघाडीचा फायदा ते मिळवण्याचा प्रयत्न करतील. ही आघाडी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच इच्छुकांनी जनसंपर्क वाढविला आहे. लोकसभेची निवडणूक अगोदर होणार आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या तर शहर मध्यसाठी कॉंग्रेसला नवा चेहरा शोधावा लागणार आहे. श्री. कोठे ऐनवेळी भाजपत गेले तर शिवसेनेसमोर तगड्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. एमआयएमची पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही, त्यामुळे तौफिक शेख यांना मते खेचण्यासाठी वंचित आघाडी घटकातील पक्षांना सोबत घेऊनच काम करावे लागणार आहे. या मतदार संघात भाजपची मते निश्‍चित आहेत. त्याचा फायदा उठविण्यासाठी भाजपकडून इच्छुक असणाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. एकूणच संभाव्य दिग्गज उमेदवारांमुळे या मतदार संघातील निवडणूक अतिशय रंगतदार होण्याचे संकेत आहेत. 

2014 मधील निकाल 
उमेदवार पक्ष मिळालेली मते 
प्रणिती शिंदे कॉंग्रेस 46907 
तौफिक शेख एमआयएम 37138 
महेश कोठे शिवसेना 33334 
प्रा. मोहिनी पतकी भाजप 23319 
नरसय्या आडम माकप 13904 
विद्या लोलगे राष्ट्रवादी 779

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com