बंडोबांना थंड करण्याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

निवडणूक कार्यक्रम 
अर्जाची छाननी - 7 फेब्रुवारी 2017 
 अपील करायची मुदत- 10 फेब्रुवारी 
अपिलावर निकाल- 13 फेब्रुवारी 
अपील नसल्यास माघार- 13 फेब्रुवारी 
अपील असल्यास माघारीची मुदत- 15 फेब्रुवारी 
मतदान 21 फेब्रुवारी, मतमोजणी 23 फेब्रुवारी. 

सांगली - झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले. ज्यांनी निवडणुकीसाठी तयारी केली होती त्यांनी अपक्ष, काहींनी अन्य पक्षांकडून उमेदवारी दाखल केली. अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशीही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आले. सर्वच पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर न करता थेट एबी फॉर्मच दिले. तरीही अनेकांनी बंडखोरी केल्यांमुळे पक्षनेत्यांपुढे बंडोबांना थंड करण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावावी लागली आहे. त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो आहे. 

झेडपीचे 60 गट आणि 10 पंचायत समित्यांच्या 120 गणांतील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शेवटच्या क्षणाला उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. तरीही ज्यांनी निवडणूक अर्ज भरायची तयारी केली होती, त्यांनी स्वतंत्र किंवा संधी मिळेल त्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. ज्या ठिकाणी पक्षांच्या विजयाची खात्री आहे, त्या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडी सुरूच राहिल्या. क्षणाक्षणाला काही वेगळे ऐकायला मिळत होते. अफवांवर विश्‍वास न ठेवता मिळालेली माहिती खरी आहे का? याचीही खातरजमा केली जात होती. उमेदवारी न मिळाल्यास काहींनी दिलेला बंडखोरीचे इशारे खरे करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन आपणही शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. सर्वच पक्षांनी आपापल्या तालुकाध्यक्षांकडे एबी फॉर्म दिले होते. तरीही बंडखोरीची शक्‍यता असलेल्या मतदारसंघात उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिले. 

निवडणूक कार्यक्रम 
अर्जाची छाननी - 7 फेब्रुवारी 2017 
 अपील करायची मुदत- 10 फेब्रुवारी 
अपिलावर निकाल- 13 फेब्रुवारी 
अपील नसल्यास माघार- 13 फेब्रुवारी 
अपील असल्यास माघारीची मुदत- 15 फेब्रुवारी 
मतदान 21 फेब्रुवारी, मतमोजणी 23 फेब्रुवारी. 

Web Title: Challenge to leader