पालकमंत्र्यांसमोर आव्हान नव्या चेहऱ्यांचे 

पालकमंत्र्यांसमोर आव्हान नव्या चेहऱ्यांचे 

सोलापूर : लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदार संघाला भेदण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची या मतदार संघातील भूमिका महत्त्वाची आहे. पालकमंत्री देशमुख यांना तगडे आव्हान देण्याची ताकद सध्या कोठे यांच्यात दिसत आहे. कोठे 'उत्तर'मधून लढणार की 'मध्य'मधून या प्रश्‍नाचे गणित अद्याप अधांतरी दिसत आहे. बसप गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापालिकेच्या माध्यमातून या भागात केलेली विकासकामे, दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.

लिंगायत बेल्टमध्ये नाराज लिंगायत समाजाच्या माध्यमातून पालकमंत्री देशमुखांना शह देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सिद्धेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी व उदय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काडादी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्‍यता कमी आहे. शिवाय सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणात भाजपने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या दिलदारपणामुळे काडादी यांच्या नावाबद्दल साशंकता वाटत आहे. 'मध्य'मध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आहेत. सोलापूर दक्षिणमध्ये माजी आमदार दिलीप माने दावेदार आहेत. त्यामुळे या दोन मतदार संघाची आशा न करता दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत शहर उत्तर आपल्याला मिळू शकतो त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे.

या मतदार संघातून मनोहर सपाटे, महेश गादेकर यांनी नशीब आजमावूनही फार काही हाती न लागल्याने आता राष्ट्रवादीच्या वतीने नवा चेहरा म्हणून शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे. पालकमंत्री देशमुख यांचा पराभव करण्यासाठी कोठे यांच्या ताकदीला बसप, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची जोड मिळणे आवश्‍यक आहे. ही जोड मिळाली तरच पालकमंत्री देशमुख यांच्या विजयाचा वारू सहज रोखता येईल, अन्यथा पुन्हा एकदा पालकमंत्री देशमुख यांचा विजय निश्‍चित आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी 15 वर्षांपासून ताबा ठेवला आहे. शांत, संयमी आणि दुश्‍मनालाही त्रास न देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पालकमंत्री देशमुखांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. या मतदार संघात 2019 साठी राष्ट्रवादीकडून संतोष पवार, बसपकडून आनंद चंदनशिवे आणि काँग्रेसकडून उदय पाटील या नवख्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com