चालुक्‍यकालीन शिलालेख सांगलीतील भाळवणीत सापडला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एक नजर

  • भाळवणी (ता. खानापूर) येथे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख.  
  • चालुक्‍य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार
  • शेतकऱ्यांकडून बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व व्यापाऱ्यांकडून दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात

मिरज - सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख भाळवणी (ता. खानापूर) येथे सापडला आहे. चालुक्‍य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला. तसेच बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. 

मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेख शोधला. जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेणी, त्यांची कामगिरी, जैन धर्मीयांचे स्थान यांची माहिती नव्याने प्रकाशात आली. हळेकन्नड लिपीतील हा जिल्ह्यातील सर्वांत जुना शिलालेख असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

भाळवणी (ता. खानापूर) गाव प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील सध्याच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथून राज्य करणाऱ्या चालुक्‍य राजांची भाळवणी उपराजधानी होती. गावात मोठी व्यापारपेठ असल्याने प्रसिद्ध व्यापारी गावात वास्तव्यास होते. गावचे नागरिक, व्यापाऱ्यांनी मोठी मंदिरे बांधल्याचा उल्लेख शिलालेखांत आहे. भाळवणी येथे यापूर्वी दोन कानडी, एक देवनागरी शिलालेख सापडले. त्यापैकी दोन चालुक्‍यकालीन, तर एक यादवनृपती दुसरा सिंघन याच्या काळातील आहेत. सर्व शिलालेख सध्या कऱ्हाड येथे आहेत. मात्र, सध्या उपलब्ध झालेला शिलालेख त्याहून वेगळा आहे.

तीन भागात शीलालेख
 
या लेखाचे तीन भाग आहेत. प्रारंभी जैन देवतेची स्तुती करण्यात आली आहे. त्यानंतर दानलेख लिहिला आहे. त्यानंतर शेवटच्या भागात शापवचन लिहिले आहे. भाळवणी येथे असलेल्या प्राचीन मूळसंघ नावाच्या जैन बस्तीचा सामान्य शेतकरी, प्रमुख व्यापाऱ्यांनी मिळून जीर्णोद्धार केला. या बस्तीतील गंध, धूप, नैवेद्य या नैमित्तिक धार्मिक कार्यासाठी काही जमीन, फुलझाडांच्या दोन बागा, काही दुकानांमधून येणारे उत्पन्न दान म्हणून दिले आहे. शिलालेखांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध प्रा. काटकर, कुमठेकर यांनी धारवाड येथे राष्ट्रीय इतिहास परिषदेत वाचला.

वर्षभर अभ्यास 

प्रा. काटकर, कुमठेकर यांना सापडलेला हळेकन्नड लिपीतील शिलालेखाचे ठसे घेऊन वर्षभर अभ्यास करण्यात आला. राहुल गंगावणे, बाळासाहेब पाटील यांनी सहकार्य केले. शिलालेखातील दान हे २० फेब्रुवारी १०७० रोजी देण्यात आले आहे. भाळवणीतील व्यापारी, ६० शेतकऱ्यांनी शिलालेख लिहून ठेवलाय. 

अभ्यासानंतरचे निष्कर्ष 

  • हा शिलालेख चालुक्‍यराजा सोमेश्वर (दुसरा) याच्या राजवटीतला आहे. 
  • सोमेश्वराची कारकीर्द सन १०६८ ते १०७६ अशी केवळ आठ वर्षेच झाली होती. 
  • या काळातील त्याचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिलालेख आढळून येतात. 
  • शिलालेख हा जुन्या कन्नड लिपीत आहे. 
Web Title: The Chalukyya inscriptions were found in Sangli Bhalavani