"चंपी'ने अजगराशी दिली अशी झुंज... 

अण्णा काळे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- शेळीच्या करडाला गिळण्याचा प्रयत्न 
- चंपी नावाच्या कुत्रीचा अजगराशी मुकाबला 
- सर्पमित्रही सायंकाळी मदतीला 

करमाळा (सोलापूर) : शेतात चरायला गेलेल्या शेळ्यांच्या कळपातील एका शेळीच्या करडाला अजगराने गिळण्याचा प्रयत्न केला. अजगराने शेळीच्या पिल्लाला पकडलेले बघताच शेजारी असलेली चंपी नावाच्या कुत्रीने अजगरावर हल्ला चढवला. चंपीने मोठ्या धैर्याने झुंज दिली. ही घटना वीट (ता. करमाळा) येथील करवंदी वस्तीवर घडली. 

येथे घडली घटना
वीट येथील शिवाजी नारायण जाधव नेहमीप्रमाणे करवंदीच्या माळरानावर शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास शेळ्या घराकडे आणण्यासाठी ते हाकत असताना, माळरानावर गवतामध्ये एका अजगराने त्यांच्या डोळ्यादेखत एका साधारण आठ ते नऊ महिन्यांच्या करडाला पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी तेथे चरत असलेल्या शेळ्या घाबरून बाजूला पळाल्या. शेळ्या का पळाल्यात म्हणून शिवाजी जाधव, कांतिलाल जाधव यांनी पुढे जाऊन पाहिले तर मोठ्या अजगराने बारा-तेरा किलोच्या शेळीच्या पिलाला विळखा घातला होता. मोठ्या अजगराला पाहून उपस्थित असलेल्या शेळी राखणदारांचे पायही थरथरू लागले होते. 

हेही वाचा : भाजपने सोडला "बाण'; शिवसेना एनडीएतून बाहेर 

चंपाने असा केला मुकाबला

दरम्यान, शिवाजी जाधव यांनी आपला मुलगा तुकाराम जाधव याला घरी आल्यानंतर याची कल्पना दिली. त्या वेळी तुकाराम जाधव तसेच त्याचा भाचा महेश वागदरे, कांतिलाल जाधव हे घटनास्थळी पोचले. तेव्हा अजगराने अर्धी शेळी गिळंकृत केली होती. पण, त्याच वेळी चंपीने मात्र या अजगराचा मुकाबला करण्यास सुरवात केली. शेळीचे पिल्लू पूर्ण गिळण्याचा प्रयत्न करताना चंपी कधी शेपटीकडून तर कधी तोंडाकडून पंजा मारून अजगराला जखमी करण्याचा प्रयत्न करीत होती. सतत पंजा मारल्याने अजगराच्या डोळ्याला मोठी इजा झाली. त्या वेळी अजगराला वेदना असह्य झाल्याने त्याने अर्धवट गिळलेले शेळीचे पिल्लू अखेर बाहेर काढले. त्यानंतरही चंपी त्याच्याशी झुंज देतच होती. 

हेही वाचा : कार-ट्रकच्या अपघातात तिघे ठार; एक जखमी 

सर्पमित्राची धाव  

तुकाराम जाधव यांनी धाडस करून अजगराचे शेपूट पकडून अवजड असलेल्या अजगराला थोड्या अंतरावर ओढले. परंतु, शेवटी ते चंपीला तेथून पाठवून सर्वजण घरी आले. दुसऱ्या दिवशी ही घटना संपूर्ण पंचक्रोशीत पोचली. त्या वेळी सकाळी घटनास्थळी तुकाराम जाधव व काही गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अजगर जिवंत होते. याची माहिती करमाळ्याचे सर्पमित्र वैभव वीर यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

वनअधिकाऱ्यांना संपर्क

या वेळी अजगराला जखमी अवस्थेत पाहून वनअधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र गुरुनानक जयंतीमुळे सुट्टीचा दिवस असल्याने कुठलाही अधिकारी वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही. दरम्यान, मोहोळच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क झाल्याने घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी त्यांना पाठवले. रात्री उशिरापर्यंतही ते घटनास्थळी पोचले नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Champi's fight with the Dragon