कोल्हापुरात साकारलेले गोवा स्टाईलचे घर आहे तरी कसे ?

सुधाकर काशीद 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

घरबांधणी व त्याचे सौंदर्य हे जरूर एक शास्त्र आहे. पण, घराचे सौंदर्य त्यातल्या किमती शोभेच्या वस्तूंपेक्षा त्या घराचा साधेपणा, टापटिप आणि सौंदर्यदृष्टी यावरच अधिक अवलंबून असते. अशा काही घरांच्या अंतर्भागाचा वेध घेणारे ‘सुंदर माझे घर’...

कोल्हापूर - गोव्यातली घरे सर्वांना आकर्षित करतात. असं आपलं घर हवं, हाच विचार ही घरे आपल्या मनात आणतात. पण, वास्तवात अनेक अडचणी असतात. त्यामुळे अशा घराचे विचार बाजूला ठेवावे लागतात. मात्र, चंदन मिरजकर यांनी ठरवलंच, आपण कोल्हापुरात घर बांधायचं व ते गोवा स्टाइलचंच. आणि त्यांनी तसं ते आर. के. नगरात उभारलं. घर म्हटलं तर छोटंसं; पण बैठकीची खोली, स्वयंपाकघर, डायनिंग टेबल हे सारं एका एल आकाराच्या शैलीत एकत्रित बसवलं आणि कमी जागेत भरपूर प्रकाश झुळझुळणारे वारे, झाडी-झुडपांच्या सहवासात हे घर गेली १७ वर्षे आनंदानं रमून गेलं. 

प्रत्येकाला आपलं घर सुंदर असावं, असं वाटतं. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. कित्येकदा घरं सुंदर बनवण्याची जबाबदारी तज्ज्ञांकडे सोपवली जाते. त्यातून घर देखणं होतं; पण आपल्या मनातलं घरं जसंच्या तसं क्वचितच साकारतं. चंदन मिरजकर यांनी ठरवलं, आपण घर बांधायचं. पण, उगीच दहा ते बारा खोल्यांनी गच्च गुदमरून टाकायचे नाही. म्हणून त्यांनी पहिला मजला फक्त ७५० चौरस फुटात बांधला. त्यातही किचन, बैठक रूम, डायनिंग हॉल यात भिंतच ठेवली नाही. वरच्या ७५० चौरस फुटांच्या जागेत फक्त एकच खोली बांधली व त्या खोलीच्या छतावर स्लॅबऐवजी चक्क काचच घातली. उरलेली सर्व जागा बाल्कनीचे व्यापक स्वरूप असलेल्या बाल्कोत वापरली. 

घराच्या चौकटीवर गोवा संस्कृतीची प्रतीके असलेली टेराकोटा मातीची उठाव शिल्पे चिकटवली. दिवाणखान्यात खुर्च्या, कोच, टिपॉय, उंच फ्लॉवर प्लॉट याची गर्दी टाळली. अवघ्या दहा ते बारा इंच उंचीवर भारतीय बैठक घातली. आणि केवळ निवांत नव्हे नि - वां - त बसण्याची सोय केली. स्वयंपाक करता-करताच वहिनींना टीव्ही पाहता येईल, अशी रचना केली.

डायनिंग हॉलसाठी जुना लाकडी पलंग आणला. त्याचे पाय कापले. त्यावर ग्रॅनाईट घातले व मांडी घालून बसता येईल अशा पद्धतीचे डायनिंग टेबल तयार केले. वरच्या मजल्यावर फक्त एकच खोली ती कन्या तेजस्विनीसाठी केली. या खोलीच्या छतावर चक्क भलीमोठी काच टाकली. या खोलीत बसून काचेच्या छतावर पडणारा पाऊस पाहणे म्हणजे निसर्गाची एक पर्वणीच ठरली. या खोलीत आकाशाकडे तोंड करून झोपले की वरच्या काचेतून चांदण्या दिसतात. मध्यरात्री वरपर्यंत आलेला चंद्र दिसतो. अमावास्येच्या रात्रीही अवकाशाचा एक वेगळा गूढ रंग या खोलीतून अनुभवता येतो. पावसाळ्यात तर अंगावर एक थेंबही न पडता झिम्माड पाऊस अनुभवता येतो.

अलीकडे घराचे सौंदर्य घराच्या सजावटीवर किती खर्च केला, यावर ठरविले जाते. पण, १७ वर्षांपूर्वी अवघ्या साडेसात-आठ लाखांत बांधलेले हे घर आता अमूल्य असे लेबल लावून कौतुकाचा विषय आहे. अर्थात, घर चंदन मिरजकरांचे आहे; पण पत्नी नेहा व कन्या तेजस्विनी यांचा या घराचे घरपण टिकवण्यातला वाटा खूप मोठा आहे. त्यामुळे सुंदर घर, असाच या तिघांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

आपल्यालाही अशा साध्या आणि सुंदर घरांची माहिती असल्यास आम्हाला जरूर कळवा.
व्हाट्स अप नंबर - ९१४६१९०१९१


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandan Mirajkar Goa Style House In Kolhapur