सिद्धेश्‍वर वनविहारात चंदन चोरांसोबत वन अधिकाऱ्यांची झटापट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

वन विभागाच्या ताब्यात असलेल्या आणि विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्‍वर वन विहारात यापूर्वी चार ते पाचवेळा चंदनचोरीच्या घटना घडल्या आहेत.

सोलापूर - सिद्धेश्‍वर वन विहारात चंदन चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांसोबत वन विभागाचे अधिकारी आणि सुरक्षारक्षकाची झटापट झाली. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. 

वन विभागाच्या ताब्यात असलेल्या आणि विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्‍वर वन विहारात यापूर्वी चार ते पाचवेळा चंदनचोरीच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्यावेळी झाडं तोडून होणारी चंदन चोरी रोखण्यासाठी वन विभागाने रात्रीच्यावेळी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच गस्त घालण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकी वाहनांवरून आलेल्या सहा जणांची टोळी वन विहारात जाण्याच्या प्रयत्नात होती. सुरक्षा रक्षकाने त्यांना पाहिले. लागलीच वन अधिकाऱ्यांना कळविले. काही वेळातच वन अधिकारी तिथे आले. त्यांनी चंदनचोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी पाठलाग केला. दोघांना पकडून चांगला चोप देण्यात आला. त्यानंतर त्यांनी पळ काढला. चंदनाची झाडं तोडण्यासाठीची सोबत आणलेली कुऱ्हाड, करवत, फावडे जप्त करण्यात आले आहेत. तसेच दोन दुचाकी वाहनेही वन विभागाने जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. या झटापटीत सुरक्षा रक्षक आणि वन विभागाचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. 

तुळजापूर बसची तिकिटे 
चोरीसाठी वन विहारात आलेल्या चोरट्यांनी पळ काढला असला तरी त्यांची कपडे सापडली आहेत. शर्टाच्या खिशात तुळजापूरहून सोलापूर आलेल्या बसची तिकिटे सापडली आहेत. चोरीसाठी तुळजापूरहून टोळी आली होती का? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. वन विभागाप्रमाणेच पोलिसही या विषयाकडे अपेक्षित लक्ष देत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. 

सिद्धेश्‍वर वन विहारात जाण्याआधीच चोरट्यांना रोखण्यात आम्हाला यश आले. कुष्ठरोग वसाहत परिसरातून त्यांनी पळ काढला. सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला. दोन वाहने आणि हत्यारे सापडली असून ती सैफुल पोलिस चौकीत जमा करण्यात आली आहेत. 
- निकेतन जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Chandan thief in Siddheshwar Vanavihar