राष्ट्रवादीतून चंदगडमधून  "आई' साहेब की "ताई'साहेब? 

अजित माद्याळे
सोमवार, 24 जून 2019

गडहिंग्लज - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. चंदगड मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर (आईसाहेब) यांना पुन्हा संधी मिळते की त्यांची कन्या डॉ. नंदीनी बाभूळकर (ताईसाहेब) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, या चर्चेला आतापासूनच उधाण आले आहे. परंतु उमेदवारीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात असल्याने ही चर्चा निवडणुकीपर्यंत कायम राहणार आहे. 

गडहिंग्लज - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. चंदगड मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर (आईसाहेब) यांना पुन्हा संधी मिळते की त्यांची कन्या डॉ. नंदीनी बाभूळकर (ताईसाहेब) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, या चर्चेला आतापासूनच उधाण आले आहे. परंतु उमेदवारीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात असल्याने ही चर्चा निवडणुकीपर्यंत कायम राहणार आहे. 

पूर्वीच्या गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात सलग तीनवेळा आणि पुनर्रचनेनंतर सलग दोनवेळा कुपेकरांच्या वाड्याला आमदारकीचा बहुमान मिळाला. कै. बाबा कुपेकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसह 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांच्या पत्नी श्रीमती संध्यादेवी यांना मतदारांनी विधानसभेत पाठविले. गत निवडणुकीपासून संध्यादेवींच्या पाठीशी उभ्या असलेल्या व चंदगडच्या राजकारणात सक्रीय झालेल्या त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीला तरूण चेहरा देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असला तरी दुसऱ्या बाजूने प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांच्या विजयी क्षमतेचीही चाचपणी करून उमेदवारी देण्यासह पक्षाचे अधिकाधिक आमदार विधानसभेत पाठविण्याचा इरादा जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर चंदगड मतदारसंघातील उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी कोणता निकष लावणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये आता ताईसाहेबच उमेदवार अशी चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे असल्याने निवडणुकीपर्यंत ही चर्चाच राहणार असून, कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे वेळच ठरविणार आहे. आमदार संध्यादेवी आणि डॉ. नंदिनी यांच्या व्यतिरिक्त अद्याप तरी तिसरा चेहरा राष्ट्रवादीतून समोर आलेला नाही. मध्यंतरी डॉ. नंदिनी यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा जोरात सुरू होती. यादरम्यान त्यांनी कधी जाहीर वक्तव्य केले नव्हते. परंतु, गेल्या वर्षी नेसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात खुद्द डॉ. नंदिनी यांनी राष्ट्रवादीतच सक्रीय राहणार असल्याचा जाहीर खुलासा केला. त्यानंतर डॉ. बाभूळकर यांनी याच पक्षाच्या माध्यमातून राजकीय वाटचाल कायम ठेवली आहे. 

सस्पेन्स कायम 
गेल्या आठवड्यात मुंबईत पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत "आईसाहेब किंवा ताईसाहेब' कोणालाही उमेदवारी द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची अशी भूमिका उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यानी घेतली आहे. त्यावर उमेदवार कोण असतील हे तुम्हाला माहीत आहे. ऐनवेळी प्रचाराला वेळ कमी पडतो. यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच प्रचार कामाला लागावे अशी मोघम सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्याना देवून उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

"सोशल मीडियावर जाहीर भूमिका 
गेल्या काही वर्षापासून व्हाटस्‌ऍप सारख्या सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "नंदाताई मिशन विधानसभा' नावचा ग्रुप सुरू केला आहे. यावर केवळ डॉ. नंदिनी यांच्या उमेदवारीचीच चर्चा सुरू असते. विधानसभा आणि त्यात डॉ. नंदाताईंची छबी असणारा फोटो वारंवार प्रसारीत करून "आता नंदाताईच' अशी जाहीर भूमिका कार्यकर्ते घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad Assembly Constituency special report