चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा

चंदगड -  येथील ग्रामंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबतची अधिसूचना आज राज्य शासनाच्या नगरपंचायत विभागाने प्रसिध्द केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आदेशाची प्रत चंदगडच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केली. गोपाळराव पाटील, रमेश रेडेकर, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, सुनील काणेकर, ॲड.विजय कडूकर आदींनी ही प्रत स्वीकारली. नगरपंचायत मंजुरीचे वृत्त समजताच येथे ग्रामस्थांनी फटाक्‍यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला. 

ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येथील ग्रामस्थांकडून गेले वर्षभर सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमावर चार वेळा बहिष्कार टाकण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे निवेदने पाठवून, प्रत्यक्ष भेट घेऊनही प्रतिसाद मिळत नव्हता.

गेल्या दोन महिन्यांत मात्र राज्य सरकारकडून याला काहीसा प्रतिसाद सुरू झाला. भाजप नेते गोपाळराव पाटील, रमेश रेडेकर, शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन हा विषय किती महत्वाचा आहे हे समजावून सांगितले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या भावना तीव्र असून तत्पूर्वी नंगरपंचायतीला मंजुरी द्यावी अशी मागणी केली.

राज्य सरकारनेही हा विषय गांभीर्याने घेतला. अखेर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर नगरपंचायत म्हणून अधिकृत मान्यता मिळवण्यात ग्रामस्थांना यश आले. नगरंपचायत मंजूर झाल्याचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. दरम्यान मंजुरीचे पत्र स्वीकारण्यासाठी चंद्रकांत दाणी, सचिन नेसरीकर, मिलिंद सडेकर, उमेश शेलार उपस्थित होते.

यांनी केला पाठपुरावा
राजकीय पातळीवर आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. आमदार सुरेश हाळवणकर, गोपाळराव पाटील, रमेश रेडेकर, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, सुनील काणेकर, ॲड. विजय कडूकर यांनी तर  महिनाभर मंत्रालयात ठाण मांडले. या प्रयत्नातूनच हे यश पदरात पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com