पर्यावरण मंत्र्यांच्या साक्षीनेच चंद्रभागेचे प्रदूषण

भारत नागणे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहकुटुंब चंद्रभागेची आरती करत असतनाच दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदमांच्या साक्षीने चंद्रभागेच्या वाळवंटात फटाके फोडले जात होते. सुमारे तासभर सुरु असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पंढरपूरकरांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागलाच शिवाय फटाक्यात वापरण्यात आलेल्या विषारी रासायनिक पदार्थांमुळे चंद्रभागेचे पाणीही दुषीत झाले.

पंढरपूर- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहकुटुंब चंद्रभागेची आरती करत असतनाच दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदमांच्या साक्षीने चंद्रभागेच्या वाळवंटात फटाके फोडले जात होते. सुमारे तासभर सुरु असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पंढरपूरकरांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागलाच शिवाय फटाक्यात वापरण्यात आलेल्या विषारी रासायनिक पदार्थांमुळे चंद्रभागेचे पाणीही दुषीत झाले.

सकाळी पर्यावरण मंत्र्यांनी स्वच्छ केलेले चंद्रभागेचे वाळवंट संध्याकाळी त्यांच्या शिवसैनिकांनी घाण केल्याचे विदारक चित्र सोमवारी (ता.24) सायंकाळी पंढरपुरात पहायला मिळाले. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता.24) सायंकाळी चंद्रभागेच्या पैलतिरावरील इस्कॉन संस्थेच्या घाटावर चंद्रभागेची महाआरती करण्यात आली. सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास महाआरतीला सुरवात झाली. याचवेळी चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सुमारे तासभर ही आतषबाजी सुरु होती.

चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयानेच नदीपात्रात वारकऱ्यांना राहुट्या टाकण्याससह इतर कारणांसाठी न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाची बंदी असतानाही अतिउत्साही शिवसैनिकांनी कायद्याची पायमल्ली करत चक्क पर्यावरण मंत्री रामदास कदमांच्या नाकावर टिच्चून चंद्रभागा वाळवंटात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. यामुळे वायू व ध्वनी प्रदूषण झाले. शिवाय नदीपात्रातील पाणी देखील दुषीत झाले. आणखी कहर म्हणजे, फटाक्यांची रिकामे खोकी ही वाळवंटातच पेटवून देण्यात आली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पात्रामध्ये सर्वत्र धुराचे लोट पसरले होते.

विशेष पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी सकाळी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत फोटो सेशनही केले होते. पर्यावरण मंत्र्यांच्या स्वच्छतेला काही तास लोटताच त्यांच्याच शिवसैनिकांनी मात्र फटाके फोडून प्रदूषण करुन चंद्रभागेत घाण केली. याप्रकारानंतर प्रशासन कोणावर कारवाई करणार की मुजोर आणि कायदा मोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणार याकडेच वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Chandrabhaga Pollution Front Of Environment Minister