मुलींच्या दातांतील दोष दूर करणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

कोल्हापूर : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातातील दोष दूर केले जाणार आहेत. प्रत्येक सहा महिन्यांनी दातांची मोफत स्वच्छता केली जाईल. यासाठी दहा दंतवैद्यकांचे पथक तयार केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

कोल्हापूर : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातातील दोष दूर केले जाणार आहेत. प्रत्येक सहा महिन्यांनी दातांची मोफत स्वच्छता केली जाईल. यासाठी दहा दंतवैद्यकांचे पथक तयार केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

गणेशोत्सवादरम्यान पालकमंत्री पाटील यांनी झोपडपट्टीतील मुलींच्या दातांचे दोष दूर करण्यासाठी मोफत शस्त्रक्रिया आणि उपचारांची घोषणा केली होती. त्यानुसार 31 मुलींची वैद्यकीय कक्षाकडे नोंद झाली. त्यातील 18 मुलींच्या दातांवर शस्त्रक्रिया करून क्‍लीप बसविण्यात आल्या. या मुलींची तसेच त्यांच्या पालकांची येथील अयोध्या हॉटेल येथे पालकमंत्री पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन या मुलींशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी मुलींबरोबर स्नेहभोजन घेतले. 

श्री. पाटील म्हणाले, की मुलींच्या दातांवर शस्त्रक्रिया करून दातांना क्‍लीप बसविण्याचे काम सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरतर्फे मानवतेच्या आणि सामाजिक भावनेतून पार पाडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या मुलींना आई-वडील या नात्याने आवश्‍यक ते उपचार आणि सुविधा विनामूल्य देण्यात पुढाकार घेतला जाईल. जिल्ह्यातील आर्थिक मागासवर्गातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातांच्या स्वच्छतेसाठी पालकांनी कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयात वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

लक्षतीर्थ येथील श्रावणी यादव, तसेच मंगळवार पेठेतील रुद्रहंस बाणदार, तसेच पन्हाळा तालुक्‍यातील धबधबेवाडी येथील अमृता पाटील हिला मदत होणार आहे. पालकमंत्री पाटील आणि सौ. पाटील यांनी मुलींना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. 

या वेळी सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नाईक, डेंटिस्ट डॉ. दीप्ती भिर्डी, पणनचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, प्रसाद वळंजू, नितीन पाटील, अक्षय शिंदे उपस्थित होते.

Web Title: Chandrakant Patil announces scheme for dental care in Kolhapur