दोन दिवसांत देणार टंचाईच्या सवलती - चंद्रकांत पाटील

दोन दिवसांत देणार टंचाईच्या सवलती - चंद्रकांत पाटील

जत - ‘‘राज्यातील १७२ तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. दोन दिवसांत या तालुक्‍यांना टंचाईच्या सवलतींचा लाभ मिळेल. ता. ३१ नंतर सर्व्हे व दुष्काळाच्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर केला जाईल. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे  राहील,’’ असा ठाम विश्वास महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केला.

दरम्यान, जत पूर्व भागातील ४२ गावांच्या पाण्यासाठी कर्नाटकशी बोलणी सुरू आहेत. कर्नाटकने पाणी दिले नाही तर महाराष्ट्रातून पाणी देण्याबाबत विचार केला जाईल. वेळप्रसंगी कर्नाटकला पाणी देणार नाही, असेही त्यांनी 
स्पष्ट केले.

येथे १३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा आरोग्य उपकेंद्र व तालुक्‍यातील येळदरी येथे बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,  शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी पाटील, डॉ. रवींद्र आरळी, ॲड. श्रीपाद अष्टेकर उपस्थित होते. 

तत्पूर्वी जतमधील रस्ते कामाला भरीव निधी दिल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील, म्हैसाळला भरीव निधी दिल्याबद्दल खासदार संजय पाटील, महावितरणच्या संचालक नीता केळकर यांचा आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते सत्कार झाला. जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पवार यांना भाजपच्या कार्याध्यक्षपदी निवडीचे  नियुक्तीपत्र देऊन सत्कार झाला. 

चंद्रकांत पाटील म्हणाले,‘‘राज्यातील रस्ते, सिंचन व  अन्य कामे निधीअभावी रखडली होती. यापूर्वीच्या आघाडी सरकारलाही दोष देण्याचे कारण नाही. वाहने कमी होती. त्यानुसार कामे झाली; पण आज वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने कमी काळात रस्ते उखडले गेले.

भविष्यात हा दोष राहू नये म्हणून सिमेंट रस्त्यांसह पक्के रस्ते करण्यावर भर दिला आहे. विकासात सरकार मागे नाही. विरोधकाकडे मते मागण्यांसाठी कोणताही मुद्दा नाही. फेब्रुवारीत लोकसभेची आचारसंहिता लागेल. तेव्हा कामाला लागा.’’
आमदार जगताप म्हणाले,‘‘आमसभेत जतकरांनी दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तेव्हा सरकारने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा. टंचाई निधीतून पैसे  भरून प्रथम जतला म्हैशाळचे पाणी सोडावे.’’

प्रभारी सभापती शिवाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, स्नेहलता जाधव, रेखा बागेली, पंचायत समिती सदस्य सुशीला तावशी, श्रीदेवी जावीर, रामन्ना जीवनावर, विष्णू चव्हाण, नगरसेवक उमेश सावंत,  विजय ताड, प्रमोद हिरवे, विजय ताड, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, कार्याध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष अण्णा भिसे, ममता तेली, आप्पासाहेब नामद, शिवाप्पा तावशी, माणिक पाटील, शंकर वगरे, प्रमोद सावंत, अरविंद गडदे, तम्मा सगरे, प्रकाश माने, अशोक पाटील, संजय तेली उपस्थित होते.

जगताप हाच पर्याय 
पंधरा वर्षांत आघाडी सरकारला जितका निधी आणता आला नाही त्यापेक्षा दुप्पट निधी साडेचार वर्षांत खेचून आणला. येणारे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. विरोधक नव्या क्‍लृप्त्या लावून राजकारण करत आहेत. वर्षभरात म्हैसाळ योजनेच्या जतमधील मुख्य व पोट कालव्याची कामे पूर्ण होतील. जतला आमदार विलासराव जगताप यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे खासदार संजय पाटील म्हणाले. 

जगतापांना मंत्रिपद द्या 
आमदार सुरेश खाडे यांचा नामोल्लेख टाळत आमदार विलासराव जगताप हेच मंत्रिपदासाठी कसे सरस  आहेत, हे सांगताना खासदार संजय पाटील म्हणाले,‘‘जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आमदार जगताप यांचा दबदबा आहे. स्पष्ट बोलून ते कामांसाठी निधी खेचून आणतात. आतपर्यंत जिल्हा परिषद व जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. मधुकर कांबळे व सुरेश खाडे यांना निवडून आणले. प्रशासकीय व सामाजिक 
माहिती  असलेले एकमेव आमदार असल्याने जगतापांना मंत्रिपद द्यावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com