मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकेल - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

सांगली - ‘मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार का? याबाबत विरोधक शंका उपस्थित करत आहेत; पण राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल, अशीच तरतूद केली आहे. काल पहाटे पाच वाजता आरक्षणाचे गॅझेट तयार झाले असून आजपासूनच समाजाला आरक्षण मिळाले आहे. हा राज्य सरकारसाठी ऐतिहासिक निर्णय आहे,’ असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सांगली - ‘मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार का? याबाबत विरोधक शंका उपस्थित करत आहेत; पण राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल, अशीच तरतूद केली आहे. काल पहाटे पाच वाजता आरक्षणाचे गॅझेट तयार झाले असून आजपासूनच समाजाला आरक्षण मिळाले आहे. हा राज्य सरकारसाठी ऐतिहासिक निर्णय आहे,’ असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज सायंकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत आले. शास्त्री चौकात त्यांचे भाजपच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले.

या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, खासदार संजय पाटील उपस्थित होते. त्यानंतर उघड्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मारुती चौकात मिरवणूक आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. 

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘आरक्षणासाठी अनेक वर्ष संघर्ष करत असलेल्या मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले. न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाने केलेल्या अभ्यासात मराठा समाज अनेक निकषांच्या आधारे मागास असल्याचे दिसून आले. त्यामुळे मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला. राज्यात असाधारण परिस्थिती निर्माण झाली असल्याने ५० टक्‍क्‍यांपेक्षा आरक्षण द्यावे, या शिफारशींच्या आधारे आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. या विधेयकावर काल शुक्रवारी सायंकाळी राज्यपालांची स्वाक्षरी झाली आणि रात्रीत त्याची छपाई करून एक डिसेंबरच्या पहाटे आरक्षणाचे गॅझेट छापून तयार झाले आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला.’’

ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण देताना अनेक अडचणी आल्या. कोण काय म्हणाले? यावर जर बोललो तर अनेक मोठ्या नेत्यांची पंचाईत होईल. मराठा समाजाबरोबरच धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजालाही टिकणारे आरक्षण देण्यास प्राधान्य देणार आहे.’’ 

या वेळी महापालिकेचे नेते नगरसेवक शेखर इनामदार, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील व नितीन शिंदे, श्रीकांत शिंदे, युवराज बावडेकर, नगरसेवक सर्वश्री संजय कुलकर्णी, प्रकाश ढंग यांच्यासह भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

हौतात्म्य पत्करलेल्यांना श्रद्धांजली
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या ४२ कार्यकर्त्यांना पणत्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तेथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मिरवणूक आली. त्यावेळीही भाजपच्या वतीने या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Chandrakant Patil comment