भाजप, संघ मुस्लिमविरोधी नाही - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मी मुस्लिम बोर्डिंगमध्ये कसा, असा अनेकांना प्रश्‍न पडेल. भारतीय जनता पक्ष आणि संघ मुस्लिमविरोधी नाहीत. काहींनी उगाचच याचा बाऊ केला आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, तेच असे समजतात. मात्र राजकारण हे निवडणुकीनंतर संपले पाहिजे. त्यानंतर एकसंधपणे विकासकामे केली पाहिजेत.

-   चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - ‘‘मी मुस्लिम बोर्डिंगमध्ये कसा, असा अनेकांना प्रश्‍न पडेल. भारतीय जनता पक्ष आणि संघ मुस्लिमविरोधी नाहीत. काहींनी उगाचच याचा बाऊ केला आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, तेच असे समजतात. मात्र राजकारण हे निवडणुकीनंतर संपले पाहिजे. त्यानंतर एकसंधपणे विकासकामे केली पाहिजेत. चांगले काम करण्यासाठी तुमचा अल्ला आणि माझा परमेश्‍वर दोघेही मला प्रसन्न आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विकासकामे घेऊन या, असे आवाहन करून मुस्लिम बोर्डिंगच्या जागेवर व्यापारी संकुल बांधून दिले जाईल, तसेच जात-धर्माऐवजी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून मुस्मिल समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मुस्लिम बोर्डिंगला आज भेट दिल्यावर पालकमंत्री पाटील बोलत होते. 

मुस्लिम समाजासाठी तुर्बत, बाबूजी महाल येथे काही कामे केली आहेत. मात्र हा विषय मतांचा नाही. या देशात नेहमीच कोणताही पक्ष असो, धर्म असो, तो गुण्यागोविंदानेच नांदतो. राजकारणामुळे दंगे, एकमेकांविरुद्ध उभे करणे होते. मात्र निवडणुकीनंतर राजकारण संपले पाहिजे, या मताचा मी आहे. तुम्हाला नमाज पढून अल्लापर्यंत जाणे योग्य वाटते. मला मंदिरात गेल्यावर परमेश्‍वरापर्यंत गेल्यासारखे वाटते. या वेगवेगळ्या धर्माच्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही खूप कामे आणा. तुमचा अल्ला आणि माझा परमेश्‍वर माझ्यावर खूप प्रसन्न आहे, त्याचे लोक संशोधन करीत आहेत. 

श्री. पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणाचा सर्वांत मोठा प्रश्‍न निकालात निघाला आहे. आता मुस्लिम आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. काम करीत राहण्याची आपली सवय आहे. यासाठी गाजावाजा करण्याची गरज नाही. मुस्लिम बोर्डिंगमध्ये यूपीएससी, एमपीएससी परीक्षेसाठी आवश्‍यक सर्व पुस्तके देण्यासाठी मदत केली जाईल. धर्माऐवजी आर्थिक मागासलेपणावर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, की मुस्लिम समाजातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे. बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास म्हणाले, की महसूलमंत्री म्हणून श्री. पाटील यांनी मुस्लिम समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे.

कब्रस्तान परिसरातील अतिक्रमण काढावे, संरक्षक भिंती बांधल्या जाव्यात, महसूल आणि जात पडताळणीकडून मिळणारे दाखले तत्काळ मिळावेत या समस्यांचा त्यात समावेश आहे. या वेळी ज्येष्ठ संचालक पापाभाई बागवान, प्रशासक कादर मलबारी, मलिक बागवान, नगरसेवक नियाज खान, बबलू मकानदार, आसिफ मोकाशी, तौफिक मुल्लाणी, मलिक बागवान, बाबा पार्टे उपस्थित होते.

Web Title: Chandrakant Patil comment