सदाभाऊ खोतांची दुर्बीण प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे हवी - चंद्रकांत पाटील

धर्मवीर पाटील
गुरुवार, 10 जानेवारी 2019

इस्लामपूर - लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण  सदाभाऊ खोत यांचे आहे. त्यांच्याकडे कोणती दुर्बीण आहे समजत नाही, देशात काहीही नवे आले तर ते आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात कसे येईल यासाठी ते आग्रह धरतात, असे काैतुक आज महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  

इस्लामपूर - लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे आहे. त्यांच्याकडे कोणती दुर्बीण आहे समजत नाही, देशात काहीही नवे आले तर ते आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात कसे येईल यासाठी ते आग्रह धरतात, असे काैतुक आज महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व सांगली जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित सांगली जिल्हा कृषी महोत्सव व दख्खन जत्रेच्या उदघाटनप्रसंगी श्री पाटील बोलत होते.

अॅग्रोवनचे काैतुक

'सकाळ'माध्यम समुहाच्या 'अॅग्रोवन' दैनिकाचे चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले, "अॅग्रोवन प्रत्येकाने वाचला पाहिजे. त्यातील यशोगाथा प्रेरणादायी आहेत. इतरत्र शोकांतिका येतात मात्र हे दैनिक यशोगाथा मांडून शेतकऱ्यांना दिशा देत आहे."

आगामी काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी आणि बचतगटविषयक अनेक योजना येत आहेत. महिलांनी खाद्यपदार्थमध्ये अडकुन न राहता बाजारपेठेत जास्त मागणी असणाऱ्या वस्तू बनवाव्यात. त्यासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे, त्याचा फायदा घ्या, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. जोपर्यंत देशातील महिला श्रीमंत होणार नाहीत तोपर्यंत त्यांची घरातील किंमत वाढणार नाही, असेही ते म्हणाले.

राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण

यल्लम्मा स्वयंसहाय्यता समूह पाटगाव (मिरज) , शिवकृपा स्वयंसहाय्यता समूह, कोगनोळी (कवठेमहांकाळ) अंबिका स्वयंसहाय्यता समूह, रामानंदनगर (पलूस) यांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रवीण शिंदे, पुष्पवती पाटील यांनाही पुरस्कार मिळाला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "शेतकरी श्रीमंत व्हायचा असेल तर जगात नवीन काय चाललंय हे समजून घेतले पाहिजे. प्रयोग करणाऱ्या लोकांमधून प्रेरणा मिळावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. परंपरागत शेतीत आता फायदा नाही. 2 लाख 84 हजार शेतकऱ्यांना आम्ही तीन आठवडे प्रशिक्षण देणार आहोत. गटशेती करणाऱ्यांना आम्ही एक कोटी देतोय. 48 हजार ग्रामीण तरुणांना डेअरी व विविध प्रक्रिया केंद्रे यांचा सहा महिन्यांचा मोफत मार्गदर्शन देत आहोत. दोन हजार ठिकाणी हवामान केंद्रे आहेत, यातून शेतकऱ्यांना अद्यावत माहिती दिली जातीय. सामान्य शेतकरी सुखी, आनंदी व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. पिकविम्यातील भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत. त्याचा सुमारे 87 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. हमीभाव देण्यासाठी आग्रही आहोत."

जिल्हाधिकाऱ्यांचा पेरू!
जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी पिकवलेला पेरू दाखवत चंद्रकांत पाटील म्हणाले, "हा पेरू उसापेक्षा जास्त उत्पन्न देणारा आहे. वर्षाला एकरात सहा लाख रुपये मिळू शकतात, असा त्यांचा दावा आहे. असे नवे प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. कलेक्टर करतो मग आपल्याला काय हरकत आहे?"

सदाभाऊ खोत म्हणाले, "गेल्या साठ वर्षात कृषिमहोत्सव काय असतो हे आम्ही दाखवून दिले. या सरकारने ग्रामीण भागाला न्याय दिला. कृषी तंत्रज्ञान, नवीन शोध, बियाणे याच्या प्रबोधनात या प्रदर्शनाचा लाभ होत आहे. तालुक्यात आम्ही जे जे मागितले ते मिळाले आहे. पाणी योजना, रस्त्यांना मोठा निधी मिळाला. हातकणंगले मतदारसंघात पाणी योजनांसाठी 275 कोटी रुपये आणले. कृषी महाविद्यालयाला 50 कोटी मंजूर आहेत, त्याचे फेब्रुवारीत भूमिपूजन होईल. जिल्ह्यात प्रथमच निर्यात सुविधा केंद्र होत आहे. यापूर्वीच्या नेत्यांनी सत्तेच्या माध्यमातून केवळ स्वार्थ साधला. संस्था काढल्या. स्वतःच्या सग्या-सोयऱ्यांची व्यवस्था केली. भाजप सरकारने तळागाळातील माणसाला न्याय दिला. कृषी योजनांसाठी दिले जाणारे सातपटीने वाढवले आहे. 180 देशात कृषीमाल निर्यात होतोय. 16 टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला."

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, "या सरकारने शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. दुष्काळात दिलासा दिला. यशवंत पंचायतराज पुरस्कार मिळविणारी सांगली जिल्हा परिषद राज्यात आदर्श काम करत आहे. प्रदर्शनामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. महिला बचतगटासाठी चांगला व्यवसाय दिल्यास त्या राज्यात आदर्शवत काम करून दाखवतील." आमदार नाईक यांचे भाषण झाले. राजेंद्र साबळे यांनी आढावा घेतला.

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, वनश्री नानासाहेब महाडिक, नगरसेवक विक्रम पाटील, महिला बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, सी. बी. पाटील, वैभव शिंदे, राहुल महाडिक, भगवानराव साळुंखे, गौरव नायकवडी, दि. बा. पाटील, सागर खोत प्रमुख उपस्थित होते.

 

Web Title: Chandrakant Patil comment

टॅग्स