दोन्ही घाटगेंना आमदार करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

दोन्ही घाटगेंना आमदार करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुरगूड - कागल तालुक्‍यात तिन्ही गट एकत्र आले आहेत. समरजितसिंह घाटगे व संजय घाटगे यांना शब्द देतो, की विधानसभेत कोण आणि विधान परिषदेत कोण जायचं ते नंतर ठरवू; पण तुम्हा दोघांनाही विधान भवनात नेणार आहोत, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

कागलमध्ये कागलच्या राजकारणावर नाही बोललो तर लोकांना बरे वाटणार नाही. समरजितसिंह, संजय  घाटगे आणि प्रा. संजय मंडलिक एकत्र आले आहेत. त्यामुळे मंडलिकांना तालुक्‍यातून ९० हजारांचे मताधिक्‍य मिळेल व ते एक लाखाहून अधिक मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी बोलून दाखविला.

व्यासपीठावर संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे होते. दोघेही विधानसभेसाठी इच्छुक असल्यामुळे व दोघांचीही मदत लोकसभेसाठी गरजेची असल्यामुळे प्रा. संजय मंडलिक यांनी भाषणात मुत्सद्दीपणा दाखवत तिन्ही गट एकत्र आले आहेत; पण पुढे काय करायचे दादांनी सांगावे. त्या पद्धतीने आपण करू, असे सांगून दोघांच्या मनात चाललेल्या संभ्रमाला वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर दादांनी बोलताना दोघांना विधानमंडळात नेणार, असे सांगितले.

प्रा. मंडलिक यांच्या विजयाचे गणित मांडताना मंत्री पाटील म्हणाले, ‘‘विजयासाठी कागल महत्त्वाचे आहे. भुदरगडमधूनही १० हजारांचे मताधिक्‍य देऊ. दक्षिण मतदारसंघात आमदार अमल महाडिकही ताकद उभी करतील. या वक्तव्यावर मात्र हशा पिकला. त्याकडे दुर्लक्ष करत पालकमंत्री पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, महाडिक यांना मदत करण्यास पवारसाहेबांनी जरी विनंती केली, तरी आता धनंजय महाडिकांना मदत करू शकणार नाही. त्यामुळे आम्हाला सतेज पाटील यांचीही मदत मिळेल.’’

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता ते म्हणाले, ‘‘शिवसेनेचे तेथे आमदार आहेत. विधानसभा जवळ आलेली आहे, गडबड केली तर तिकीट मिळणार नाही आणि संजय पवार त्यांचे बॉस इथे व्यासपीठावर आहेत. मंडलिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावे.’’

भीतीपोटी टीका
युतीमुळे भुदरगडमध्ये मी व आमदार प्रकाश आबिटकर एकत्र आलो आहोत. आमदार आबिटकरांनी आपल्यावर टीका केली होती. भीती असल्याने टीका झाली; पण आबिटकरांना जेरीस आणण्यास आपली ताकद उभी राहिली व तेवढी ताकद आपल्याकडे आहे, असा टोला पालकमंत्री पाटील यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com