चंद्रकांत पाटलांची आश्वासनपूर्ती, उरमोडीचे पाणी वडजलमध्ये

रुपेश कदम
मंगळवार, 29 मे 2018

मलवडी (सातारा) : मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उरमोडीचे पाणी वडजलच्या शिवारात खळाळले असून आता ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली.

मलवडी (सातारा) : मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उरमोडीचे पाणी वडजलच्या शिवारात खळाळले असून आता ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली.

अनिल देसाई यांनी सांगितले की चौदा मेला चंद्रकांत पाटील हे श्रमदान करण्यासाठी नरवणे येथे आले असताना मी त्याठिकाणी तीन मागण्या केल्या होत्या. उरमोडीचे पाणी वडजल, धामणी, ढाकणी या टोकाच्या टंचाईग्रस्त गावांना लवकरात लवकर सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी व भाजपातर्फे मी केली होती. दादांनी दहा दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हे पाणी टंचाईतून तसेच चाचणी म्हणून सोडण्यात आले आहे. हे पाणी वडजल येथे आले असून यापुढे ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे. जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत हे पाणी सुरुच राहणार आहे.

माणचा पाणी प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. कुकुडवाड परीसरातील टंचाईग्रस्त सर्व गावांना पाणी मिळणार आहे. माण मधील शेतकरी टंचाईग्रस्त आहे. येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी खर्च करणे शक्य नसल्याने सर्व खर्च विशेष बाब म्हणून शासनानेच करावा अशी मागणी ही आपण केल्याने खास बाब म्हणून टंचाई निधीतून शासन सर्व खर्च करणार आहे. मात्र काही लोक पाणी सोडण्यासाठी पैसै भरावे लागतील असे सांगून शेतकर्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयापर्यंत पैसै गोळा करत असल्याची चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी कोणाकडेही यासाठी पैसै भरु नयेत असे आवाहन ही देसाई यांनी केले. उरमोडीचे पाणी शिवारात खळाळल्यामुळे या भागातील शेतकरी आनंदला आहे.

"उरमोडीचे पाणी सोडावे यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला असून पाणी उचण्यासाठी माणच्या शेतकऱ्यांकडून कसलीही रक्कम आकारण्यात येऊ नये असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. जर कोणी पैसै घेतले असतील तर शेतकऱ्यांनी तक्रार करावी. टंचाई परिस्थितीमध्ये वेळोवेळी पाणी सोडण्यासाठी आम्ही चंद्रकांतदादांकडे पाठपुरावा करु."
- अनिल देसाई, उपाध्यक्ष, सातारा जिल्हा भाजप

Web Title: chandrakant patil completes their promise urmodi water in wadjal