'शरद पवारांना पार्थ पवार निवडून यायला नकोच होते...'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

पार्थ पवार निवडून यायला हवे होते, तर त्यांनी पार्थला बारामतीतून उमेदवारी का नाही दिली, असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला.

वाई : शरद पवार यांना पक्षात आपलीच घराणेशाही चालवायची आहे, त्यामुळेच त्यांनी पार्थ पवार यांना डावलून सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी दिली. त्यांना पार्थ पवार निवडून यायला हवे होते, तर त्यांनी पार्थला बारामतीतून उमेदवारी का नाही दिली, असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला.

पाटील यावेळी म्हणाले, ‘नाचता येत नाही अन् अंगण वाकडं’ अशी काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था झाली आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या पक्षातील माणसे टिकविता येत नाहीत आणि ते भाजपावर आरोप करतात. निवडून येता येत नाही म्हणून ‘इव्हीएम मशिन’वर खापर फोडायचे. आम्ही जर ‘ईव्हीएम’ घोटाळा केला असता तर आम्ही बारामतीमध्येही निवडून आलो असतो.

मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. भाजपामध्ये मोठ्या संख्येने लोक येण्यामागे पंतप्रधान मोदी यांचे कणखर नेतृत्व देशाला लाभले असल्याचे सांगत पाटील म्हणाले, भाजपाची मते, सिद्धांत, कार्यप्रणाली लोकांना पटत आहे, म्हणूनच लोक भाजपाकडे येत  होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil criticizes Sharad Pawar on Parth Pawar candidacy