भाजपमध्ये येण्याचे मुश्रीफांना चंद्रकांतदादांचे आवतण

अजित माद्याळे
शुक्रवार, 19 जुलै 2019

गडहिंग्लज - पुढील पाचवर्षे तरी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही. यामुळे अनुभवी व अल्पसंख्यांक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आणखीन पाच वर्षे वाया न घालवता त्यांना भाजपमध्ये अधिक संधी मिळेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना जाहीर निमंत्रणच दिले.

गडहिंग्लज - पुढील पाचवर्षे तरी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही. यामुळे अनुभवी व अल्पसंख्यांक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आणखीन पाच वर्षे वाया न घालवता त्यांना भाजपमध्ये अधिक संधी मिळेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना जाहीर निमंत्रणच दिले.

विशेष म्हणजे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची व्यासपीठावरावर उपस्थिती असतानाच मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांना दिलेले आवतण जिल्ह्यातील राजकारणात विशेष चर्चेची ठरली आहे. 

येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील, आमदार मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे अध्यक्ष श्री. घाटगे, जनता दलाचे नेते  श्रीपतराव शिंदे आज एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुश्रीफ व श्री. पाटील यांच्यात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली. 

मुश्रीफ यांनी पहिल्यांदा भाषणातून दादांची राजकीय कळ काढली. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दादा थेट माझ्या कागल विधानसभा मतदारसंघात आले. त्याबद्दल त्यांचे स्वागत आणि अभिनंदनही करतो. परंतु, मला चांगल्या कामाच्या शुभेच्छा त्यांना देता येणार नाहीत. कारण मी त्यांच्या उलट्या पक्षात आहे. सोलापूरच्या दौऱ्यात दादांनी काँग्रेस - राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. परंतु, मी काय त्यात नाही. दादांनी यापूर्वीच खासगीत मला निमंत्रण दिले होते. आमच्याकडे मुस्लिम चेहरा नाही, यामुळे तुम्हाला संधी आहे असे सांगून त्यांनी भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. परंतु, भाजपला आमच्यासारख्या विरोधकांची गरज आहे. यामुळे भाजपनेही राज्यात काही विरोधक शिल्लक ठेवावेत. एखाद्या माणसाची पाच वर्षात किती प्रगती व्हावी, याचे उदाहरण म्हणून दादांकडे पहावे लागेल. आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्षपदापर्यंत त्यांची वाटचाल अवघ्या पाचच वर्षात झाल्याने त्यांच्या कुंडलीत राहू-केतू नसावा, असे वाटते. शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष आपलाच मुख्यमंत्री होणार म्हणून सांगत आहेत. या मुद्यावर अमित शहा, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं काय ठरलंय, हे काय आम्हाला माहीत नाही.

श्री. मुश्रीफ यांच्या या टोलेबाजीला स्पर्श करून चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार बॅटींग केली. ते म्हणाले, चंदगड मतदारसंघात भाजपकडून इच्छूकांची संख्या जास्त असल्याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. परंतु लोकसभा निवडणुकीत अधिक इच्छूक असलेल्या काही मतदारसंघात सर्वांनाच एका माळेत बांधून टाकले आणि यशही मिळविले. यामुळे चंदगडमधील इच्छुकांनाही एका माळेत आम्ही बांधणार आहोत. याची काळजी नसावी. मुळात मुश्रीफ यांचे काम आणि अनुभव पाहता त्यांनी आहे त्या पक्षात न राहता त्यांचा अधिक उपयोग आमच्या पक्षात होईल. पुढील पाच वर्षे तरी आघाडीचे सरकार येणार नाही हे नक्की आहे. युती सरकारने तसे कामच केल्याने आघाडीला सत्तेत असणार नाही. मी बोलतो ते खरे करून दाखवितो. यामुळे मुश्रीफ यांनी आपली पाच वर्षे आणखीन वाया न घालवता भाजपमध्ये आल्यास त्यांना अधिक संधी मिळेल. आता दहा लोकांची यादी तयार आहे. मुश्रीफ आल्यास ही संख्या 11 पर्यंत जाईल, असा टोला हाणताच उपस्थितांत एकच हशा पिकला. 

सहृदयी अन्‌ अनुभवी मुश्रीफ
भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांनी श्री. घाटगे यांच्या उपस्थितीतच मुश्रीफ यांच्या कामाचे कौतूक केले. मुश्रीफ यांचे आरोग्य क्षेत्रात मोठे काम आहे. ते मान्य करावेच लागेल. त्यांच्यासारखेच आमच्या गिरीश महाजनांचेही काम आहे. मुश्रीफ जिल्ह्यातील एक सहृदयी, अनुभवी आणि भावूक राजकीय नेते आहेत. त्यांचा अधिक उपयोग मी ज्या ठिकाणी आहे, तेथे होणार आहे. यामुळे त्यांनी विचार करावा.

दरम्यान, कागल मतदारसंघात आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे मुश्रीफ व भाजपाचे समरजितसिंह घाटगे एकमेकांविरूद्ध जोरदार तयारी करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मुश्रीफांना निमंत्रण देण्यासह त्यांचे झालेले कौतूक चर्चेचे ठरले आहे.

माझं - दादांचंही ठरलंय...
श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यात कोणाचे काय पण ठरू दे, मुख्यमंत्री कोणाचा हे पण त्यांच्यात ठरलंय म्हणे, पण ते आम्हाला माहीत नाही. मात्र जिल्ह्यात 'माझं आणि दादाचं' ठरलंय. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करून कोल्हापूर देशात नंबर एकचा जिल्हा बनवण्यासाठी एकमेकांनी हातात हात घालून काम करायचं, असं आमचं ठरलेलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil invite Hasan Mushrif to enter BJP