जयंतराव भाजपच्या वळचणीला या - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

सांगली - भाजपने पालिका निवडणुकीत निर्धार व विश्‍वासाने लढा देऊन इस्लामपूर जयंतरावांचा, तासगावात आर. आर. पाटील गटाचा, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा तर इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यांचा बुरुज ढासळला आहे. त्यांना काही बाकी राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपच्या वळचणीला यावे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. 

सांगली - भाजपने पालिका निवडणुकीत निर्धार व विश्‍वासाने लढा देऊन इस्लामपूर जयंतरावांचा, तासगावात आर. आर. पाटील गटाचा, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा तर इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यांचा बुरुज ढासळला आहे. त्यांना काही बाकी राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपच्या वळचणीला यावे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. 

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या "आलेख वर्षभराच्या कार्याचा' या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त झालेल्या सुराज्य मेळाव्यात ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ आदी व्यासपीठावर होते. 

श्री. पाटील म्हणाले, ""पालिका निवडणुकांच्या तोंडावर एका कंपनीकडून मी सर्वेक्षण करून घेतले होते. त्या सर्वेक्षणाप्रमाणेच यश मिळाले. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बुरुज ढासळले. त्यांनी भाजपच्या वळचणीला यावे, मात्र कुणाला घ्यायचे हे आम्ही ठरवू. शिल्लक असतील तेवढेच तिकडे राहतील. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होताहेत. कालच रिपोर्ट मिळाला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकेल, तोही फक्त भाजपच्या ताकदीवर.'' 

ते म्हणाले, ""आमदार सुधीर गाडगीळ लोकांत मिसळून काम करतात. त्यामुळे लोकांचे प्रश्‍न खूप गतीने सुटताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना जो शब्द दिला तो पूर्ण केला आहे. सामान्य माणसाचे प्रश्‍न सोडवतानाच महाराष्ट्राच्या अस्मितेचे विषयही मार्गी लावले आहेत.'' 

आमदार गाडगीळ यांनी गेल्या दोन वर्षांत उभे केलेले विकासकाम हे कार्यकर्त्यांच्या बळावर शक्‍य झाल्याची भावना व्यक्त केली. कोल्हापूरप्रमाणे सांगलीला प्राधिकरण स्थापन करा, म्हणजे विकासाला वेग देता येईल, अशी मागणी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. खासदार पाटील, श्री. देशमुख, श्री. खाडे, श्री. पडळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आढावा घेतला. माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, नीता केळकर, गोपीचंद पडळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते. भारती दिगडे यांनी सूत्रसंचालन केले. 

भाजप जात नाही, काम बघतो! 
आमदार सुधीर गाडगीळ ब्राह्मण असल्याने निवडून येणार नाहीत, असे सांगणाऱ्यांना पालकमंत्र्यांनी फटकारले. ते म्हणाले, ""भाजप जात पाहून नाही तर काम आणि लोकसंपर्क पाहून, चारित्र्य पाहून संधी देतो. गाडगीळ यांनी संधीचे सोने केले असून पुढील अनेक वर्षे तेच सांगलीचे आमदार राहतील. इतरांनी संधीचं विसरून जावं.'' 

Web Title: chandrakant patil in sangli