चंद्रकांत पाटील यांचा पक्षसंघटनेतही दबदबा 

चंद्रकांत पाटील यांचा पक्षसंघटनेतही दबदबा 

कोल्हापूर - गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असा राजकीय प्रवास केलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.  या निवडीने राज्याच्या राजकारणाबरोबरच पक्षसंघटनेतही श्री. पाटील यांचा दबदबा वाढला आहे.

कोल्हापूरचे जावई व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तर कोल्हापूरचे सुपुत्र श्री. पाटील पक्षाचे राज्याचे अध्यक्ष असा एक योगायोगही यानिमित्ताने जुळून आला. गिरणी कामगार वडिलांमुळे श्री. पाटील यांचे वास्तव्य बरीच वर्षे मुंबईतच होते. पाटील यांच्या आयुष्याची सुरवात खडतरच झाली. 

चाळीतील दोन खोल्यांत ते राहायचे. महाविद्यालयाचे शिक्षण घेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले आणि तेथून पुढे 13 वर्षे ते संघटनेत काम करत राहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील विविध पदे त्यांनी भूषविली. संघटनेच्या माध्यमातून काश्‍मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते आसाम असे भारतभ्रमण करून श्री. पाटील यांनी खऱ्या अर्थाने देश समजावून घेतला. 

विविध मोठ्या नेत्यांशी संबंध आले; परंतु राजकारणात गॉडफादर असेल तरच मोठी पदे मिळतात, याला छेद देण्याचे काम त्यांच्या निवडीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा श्री. पाटील यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली. पक्षसंघटनेत तळागाळात काम केल्याचे त्यांना मिळालेले हे पहिले फळ होते. 

त्यांच्याकडे सुरवातीला सहकार, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सोपवला. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रिमंडळात कोल्हापूरला असे मोठे स्थान मिळाले होते. तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर महसूल व मदत व पुनर्वसन अशी महत्त्वाची खातीही श्री. पाटील यांच्याकडे आली आणि मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांना सन्मान मिळाला. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच हा बहुमान श्री. पाटील यांच्या रूपाने मिळाला. 

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रात मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण? या प्रश्‍नाला श्री. पाटील हे एकमेव उत्तर होते; तथापि या पदासाठी अनेकांची नावे पुढे येत होती. अखेर पक्षाशी एकनिष्ठ, लोकसभा निवडणुकीत केलेल्या तडजोडी आणि त्यातून पक्षाला मिळालेले घवघवीत यश, या निकषावर राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतर पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी श्री. पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा आज केली. या निवडीने पक्षसंघटनेत श्री. पाटील यांच्यासह कोल्हापूरचाही दबदबा वाढला. 

कोल्हापूर, सोलापूर, माढा, सांगली लोकसभेच्या विजयात वाटा 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही श्री. पाटील यांनी नेतृत्वाची चुणूक दाखवत पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत "कमळ' फुलवले. कोल्हापूरच्या दोन्ही जागांसह सोलापूर, माढा, सांगली येथील लोकसभेच्या जागांच्या विजयात श्री. पाटील यांचा मोठा वाटा होता. पक्षाच्या विजयासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेल्या तडजोडीमुळेच पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला "अच्छे दिन' आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com