चंद्रकांतदादा सांगलीत कशाचा अभ्यास करताहेत ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

सर्किट हाऊसवर ते पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत "वन टू वन' चर्चा करत आहेत. सोबत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील महापौर बदल आणि जिल्हा परिषदेतील काठावरील सत्ता वाचवण्यासाठीची रणनितीही ते ठरवणार आहेत.

सांगली - राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु असताना विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्ह्यातील पराभवाच्या कारणमीमांसेत व्यस्त आहेत.

येथील सर्किट हाऊसवर ते पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत "वन टू वन' चर्चा करत आहेत. सोबत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील महापौर बदल आणि जिल्हा परिषदेतील काठावरील सत्ता वाचवण्यासाठीची रणनितीही ते ठरवणार आहेत. अनेक भाजप नेते सकाळपासून तेथे थांबून आहेत. 
चंद्रकांतदादांच्या दौऱ्याची आखणी प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी केली आहे.

हेही पाहा -  राष्ट्रवादी, शिवसेनेने इस्लामपूर पालिकेच्या सभेवर का घातला बहिष्कार ?

असे का घडले? कोण आहेत घरभेदी?

सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि जत या दोन विधानसभा मतदार संघात भाजपला झटका बसला. चारवरून आमदार संख्या दोनवर आली आहे. सांगलीतील मताधिक्‍य काठावरचे असून मिरजेत एक लाख मताधिक्‍याचा ढोल पिटला जात असताना केवळ 30 हजार मतांनी माजी मंत्री सुरेश खाडे विजयी झाले. असे का घडले? कोण आहेत घरभेदी? कुणामुळे अंडरकरंट सुरु झाला? कुठे गणित चुकले? बंडखोरीची वेळ का आली? बंडखोरांनी तो निर्णय का घेतला? आता पुढे काय? बंडखोरांचे काय करायचे? असे अनेक प्रश्‍न होते. त्यावर चंद्रकांतदादा खल करत आहेत. 

हेही पाहा - रविकांत तुपकर म्हणाले, शेतकरी संघटनेने केलाय  हा निर्धार

लातूरमधील घडामोडीनंतर सांगलीत भाजप सावध

महापौर निवडीचा विषय आता तापू लागला आहे. संगीता खोत या राजीनामा देणार का, याची स्पष्टता नाही, मात्र अनेकांनी इच्छा व्यक्त करत नेत्यांवर दबाव निर्माण केला आहे. लातूर महापालिकेत भाजपचे जादा नगरसेवक असताना तेथे महापौर कॉंग्रेसचा झाला आहे. त्यामुळे सांगलीत भाजप नक्कीच सावध असणार आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा येथे काय रणनिती आखतात, याकडे लक्ष असेल. जिल्हा परिषदेत भाजप, शिवसेना, रयत आघाडी अशी सत्ता आहे. राज्यात नवे समीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचा परिणाम झाल्यास जिल्हा परिषदेत सत्ताबदल होऊ शकतो. त्याची तयारीही या बैठकीत करण्यात आल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Studying On Defeat In Sangli