चंद्रकांत पाटलांकडून सतेज पाटलांना शुभेच्छा का?

सुयोग घाटगे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांना हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर : कोल्हापूरचे आणि पुण्याचे पालकमंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांना हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. दोघेही कोल्हापूरचा मानाचा गणपती असणाऱ्या तुकाराम माळी तालमीच्या गणेश पूजन आणि पालकी मिरवणुकीनिमित्य एकत्र आले होते. 

दरम्यान, एकीकडे भाजपने काँग्रेसमुक्त भारतासाठी कंबर कसली असताना मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा विडा सतेज पाटील यांनी उचलला आहे. राज्याचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील तर कोल्हापूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आज गुरुवार (ता. 12) सामोरासमोर आले. निमित्य होते ते कोल्हापूरचा मानाचा गणपती असणाऱ्या तुकाराम माळी तालीमच्या विसर्जन मिरवणूक प्रारंभाची.

दरम्यान, या ठिकाणी एकत्र येताच चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्याशी हस्तांदोलन करत अध्यक्ष निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांचा सतेज पाटील यांनी हसत स्वीकार करत धन्यवाद मानले. तसेच गणपतीच्या आरतीनंतर दोघांमध्ये सुमारे 5 मिनिटे चर्चा चालली होती. गणपतीसमोर आणि विधानसभेच्या तोंडावर नेमकी ही चर्चा काय हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil wishes Satej Patil in Kolhapur