"जयंत पाटील  भडक वक्तव्ये करून हिंसेचे समर्थन करत आहेत"

धर्मवीर पाटील | Wednesday, 27 January 2021

राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि रयत क्रांती संघटना कामगार आघाडी यांच्यातर्फे आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्या निमित्ताने इस्लामपुरात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

इस्लामपूर (सांगली) : शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात जे चालले आहे त्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे हिंसेचे समर्थन करत लोकांमध्ये भडक वक्तव्ये करून हिंसा निर्माण करत आहेत. ते मंत्री आहेत आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, सर्वसामान्य नागरिकसुद्धा हिंसेचे समर्थन करू शकत नाहीत, याचे भान त्यांनी ठेवावे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला. जयंत पाटील यांच्या परिसंवाद यात्रेला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि रयत क्रांती संघटना कामगार आघाडी यांच्यातर्फे आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्या निमित्ताने इस्लामपुरात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, "शेतकरी आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याबाबत उगीच काही स्टोऱ्या तयार करू नयेत, सगळ्या जगाने हे पाहिले आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असलेले लोक मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या या आंदोलनात उतरले आहेत, त्यामुळे प्रचंड हिंसाचार झाला आहे. आपण केलेला हिंसाचार लपविण्यासाठी नवनवीन स्टोऱ्या तयार केल्या जात आहेत, जगाने टीव्हीच्या माध्यमातून हे पाहिले आहे. भाजप सरकारवर आरोप करून लोकांना भडकवले जात आहे. केंद्र सरकारने नऊ वेळा शेतकरी संघटनांशी चर्चा केली. चर्चेतून खूप गोष्टी मान्य झाल्या होत्या. 

Advertising
Advertising

हेही वाचा- मगरीच्या दर्शनाने गाव भेदरलं

केंद्र सरकार या कायद्याची अंमलबजावणी थांबवेल असे सांगून शेतकरी नेत्यांना आवाहन केले होते की, समिती नेमून चर्चेतून मार्ग काढेल, यापेक्षा जास्त आणखी काय करायला हवे होते? हिंसेचे समर्थन न करता आंदोलने झाली पाहिजेत."

ते म्हणाले, "कोरोनाच्या काळात भीतीमुळे स्वतःला घरात बंदिस्त करून घेतलेले मुख्यमंत्री उद्धवजी आता प्रासंगिक बाहेर दिसू लागले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसी यासह राज्यात बरेच महत्त्वाचे प्रश्न आहेत, परंतु मंत्र्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी, कामगार किंवा ज्यांना आवश्यकता आहे, अशांना कोणतीही मदत मिळाली नाही. जोपर्यंत कामगार, शेतकरी, शिक्षक जोवर रस्त्यावर उतरत नाहीत, तोवर सरकारला जाग येणार नाही."

संपादन- अर्चना बनगे