अपघात रोखण्यासाठी वाहनचालवण्याच्या सवयी बदला... 

Change driving habits to prevent accidents ...
Change driving habits to prevent accidents ...

सांगली : "अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी अनेक सवयी बदलल्या. त्यामुळे त्यावर मात करणे शक्‍य झाले. तसेच वाहन चालवण्याच्या सवयी बदलण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सैनिक संकुल येथे आयोजित 32 व्या रस्तासुरक्षा अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने अभियानाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ""अपघातांमुळे होणारी वित्त आणि जीवितहानी टाळण्याचे प्रशासनाकडून काटेकोर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा शाश्‍वत बदल केल्यास अपघात नक्कीच कमी होतील. गतवर्षी जिल्ह्यातील अपघात तसेच अपघातामधील मृतांची संख्या लक्षणीय घटली आहे. ब्लॅक स्पॉटही कमी झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.'' 

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, ""पूर्वी रस्तासुरक्षा अभियान आठ ते पंधरा दिवस घेतले जात होते. यावर्षी मात्र शासनाने त्याचा कालावधी वाढवला आहे. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी हा कालावधी वाढवण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाया होऊनही अपघात होत आहेत. त्यामुळे आता अपघातातील वित्त, जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहूनच नियम पाळावेत.'' 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत सर्वांना शपथ दिली. तसेच वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन केले. मान्यवरांच्या हस्ते महिलांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. उद्‌घाटनानंतर कर्मवीर चौक, विश्रामबाग चौक, विजयनगर चौक, विश्रामबाग चौक, कर्मवीर चौक या मार्गावर महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, अपर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, उपाधीक्षक अजित टिके, वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, सचिन पाटील आदी उपस्थित होते. मोटार वाहन उपनिरीक्षक अश्विनी पाटील, कोमल होनमोरे यांनी सूत्रसंचालन केले.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com