भाजपचे डिपॉझिट वाचले तर माझं नाव बदला- जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

उद्धव कागदी वाघ
जयंत पाटील म्हणाले, ''बाळासाहेबांचे खरे गुण जर उद्धव ठाकरे यांच्यात असतील आणि हे जर खरे वाघ असतील तर, 23 तारखेला शिवसेना, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतील. मात्र तसे झाले नाही तर मात्र तो कागदी वाघ आहे हे आपोआपच सिद्ध होईल.''

तासगाव : भाजपचे संख्याबळ म्हणजे केवळ राजकीय सूज आहे. तिकडे गेलेले कधी परत फिरतील हेही त्यांना समजणार नाही. या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले नाही तर माझे नाव बदला, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी येथे दिले.

ढवळी (ता. तासगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुक्‍यातील प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार सुमन पाटील, अविनाश पाटील यांच्यासह तालुक्‍यातील नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ''देवेंद्र फडणवीस यांची जुनी भाषणं मी तुम्हाला आणून देतो. ती वाचली तर इथं भाजपचे डिपॉझिट जप्त झालेले असेल. भाजपच्या लाटेचा काळ ओसरला. लाट असतानासुद्धा भाजपचे राज्यात स्पष्ट बहुमत येईल इतके आमदार निवडून आले नाहीत. जे आमदार निवडून आले त्यातील अर्धे निम्मे आयात केलेले नेते आहेत. त्यामुळे सत्तेसाठी मुख्यमंत्री येतील, ते अगदी गुंडांनाही पक्षात घेताना मागे पुढे पाहत नाहीत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. याचा अर्थच मुळी दोघेही भ्रष्टाचारी आहेत. त्याचा पुरावाच ते मुंबईतील प्रचार सभेत देत आहेत.''

ते म्हणाले, ''आयाराम-गयारामांना जनता जागा दाखवेल. निष्ठा नसलेले कार्यकर्ते, हे अन्य पक्षात जात असतात. उलट ते गेले ते चांगलेच झाले. कारण आत्ता सच्च्या आणि खऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळेल. नेत्यांच्या मागे-पुढे फिरणारे आणि फायदा करून घेण्यासाठी जवळ असणारेच लोक वारंवार पक्ष बदलतात. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पहिल्या बॅचचा अनुभव वाईट आहे. त्यांची कामे भाजपात होत नाहीत. भाजप नेते त्यांचा फोन पण उचलत नाहीत. त्यामुळे ही नाराज पहिली बॅच राष्ट्रवादीला आतून मदत करेल.''

आमदार सुमन पाटील म्हणाल्या, ''आबांच्या विचाराचा हा तालुका फुटिरांना योग्य जागा दाखवेल. गेलेल्यांना शुभेच्छा, चांगल्या लोकांसाठी पक्षात चांगले स्थान आहे.''
आबांच्या कन्या व युवती राष्ट्रवादीच्या नेत्या स्मिता पाटील म्हणाल्या, ''गेले ते कावळे आणि उरले ते मावळे. हे मावळेच आता धडा शिकवतील.''
अविनाश पाटील म्हणाले, ''पक्ष एकदिलाने आजही उभा आहे. ते निवडणुकीतील यशाने सिद्ध होईल.'' या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष स्नेहल पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, मेधाताई साबळे, हणमंत देसाई, शंकरदादा पाटील आदी उपस्थित होते.

'रंग बदलणारे सरडे आटपाडीत'
जयंत पाटील म्हणाले, ''राजेंद्रअण्णा रात्री ए, बी फॉर्म घेऊन गेले. आम्ही तर स्थानिक आघाडीचा अधिकारही त्यांना दिला. मात्र त्यांच्या अडचणी असतात, कुठं तर घोंगडे अडकलेलं असतं. काही तर बाहेर येऊ नयेत म्हणून अन्य पक्षात जाऊन नमस्कार करतात,'' अशी टीका श्री. पाटील यांनी आटपाडी तालुक्‍यात भाजपात गेलेल्या राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यावर केली.

ते म्हणाले, ''असे नेते म्हणजे पक्षबदलू, रंग बदलणारे सरडेच आहेत. सामान्य माणसाला आपल्या गावातील नेत्याने पक्ष बदलला याच दुःख असतं. डी. के. पाटील आदींच्या प्रवेशावर ते म्हणाले, ''आर. आर. आबांच्या तालुक्‍यात कोण कुठं गेलं तरी काही फरक पडणार नाही.''

Web Title: change my name if bjp's deposit is