पंढरपूर विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने नगरसोल-पंढरपूर आणि अकोला-पंढरपूर विशेष गाड्या पंढरपूर येथे यात्रेच्या दिवशी काकड आरतीनंतर पोहोचतील, असे चुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले

पंढरपूर : दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने नगरसोल-पंढरपूर आणि अकोला-पंढरपूर विशेष गाड्या पंढरपूर येथे यात्रेच्या दिवशी काकड आरतीनंतर पोहोचतील, असे चुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून गुरूवारपासून (ता. ११) परभणीमार्गे तीन विशेष रेल्वे गाड्या धावतील. 

पहिली नगरसोल-पंढरपूर विशेष रेल्वे ११ जुलै रोजी नगरसोल येथून सकाळी पाच वाजता निघेल. ती औरंगाबाद ६.३०, जालना ८, सेलू ९.३०, परभणी १०.४० वाजता येवून साडेअकराला निघणार आहे. पुढे गंगाखेड, परळीमार्गे पंढरपूरला रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे. परतीत पंढरपूर-नगरसोल रेल्वे १३ जुलै रोजी सकाळी आठला निघून परभणीत सायंकाळी ६.४५ येवून औरंगाबादकडे निघणार आहे. तील ११ डब्यांची सुविधा राहणार आहे. दुसरी गाडी अकोला-पंढरपूर देखील ११ डब्यांची असेल. ती ११ जुलै रोजी सकाळी ५.५० ला निघून वाशिम ६.३५, हिंगोली ७.४५, पूर्णा ९.३५, परभणी १०.२५ वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेस परभणी स्थानकावर नगरसोल-पंढरपूर रेल्वेला जोडून एकुण २२ डब्यांची नगरसोल-अकोला-पंढरपूर रेल्वे पंढरपूरला रवाना होणार आहे. परतीला पंढरपूर १३ जुलै रोजी सकाळी आठ वाजता निघून परभणीत सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचणार. परभणी येथे प्रत्येकी ११ डब्यांची पंढरपूर-अकोला आणि पंढरपूर-नगरसोल वेगळे करून दोन्ही गाड्यांना रवाना करण्यात येणार आहेत. 

तिसरी गाडी अदिलाबाद-पंढरपूर रेल्वे ११ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता आदिलाबाद येथून निघणार आहे. ती किनवट-मुदखेडमार्गे नांदेड येथे दुपारी १, पूर्णा १.४५, परभणी २.२५ आणि अखेर पंढरपूरला रात्री ११.३० वाजता पोहोचविण्यात येणार आहे. परतीला पंढरपूर येथून १३ जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता निघून परभणीत दुपारी ३.०५, पूर्णा ३.५० नांदेड ४.१५ आणि अदिलाबादला रात्री ८.४० वाजता पोहोचणार आहे. तिला देखील ११ डब्बे आहेत. 

प्रवाशी महासंघाचे प्रयत्न 
चुकीच्या वेळेबाबत मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्या, नांदेड विभागाचे मुख्य परीवहन प्रबंधक ए. श्रीधरन, अतिरिक्त परीवहन प्रबंधक श्री. रायडू यांच्याशी संपर्क साधून दोन्ही रेल्वे गाड्यांचा वेळ बदलण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: change in schedule of special railways of Pandharpur