करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती चर्चेमागे ‘यंत्रणा’ कार्यरत

सुधाकर काशीद
शनिवार, 20 जुलै 2019

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलणार, नवी मूर्ती बसविणार, अशा चर्चेचा खडा आपणच टाकायचा आणि उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या की आपणच इन्कार करायचा, अशा स्वरूपाचा विचित्र खेळ अंबाबाईच्या मूर्तीसंदर्भात सुरू झाला आहे. अशा चर्चेचे भाविकांवर काय परिणाम होतात, याचा विचार न करता काही कालावधीनंतर अशी चर्चा काही जण मुद्दाम सुरू करतात आणि नंतर हळूच बाजूला जातात, असा गेल्या दोन-तीन वर्षांतला अनुभव आहे.

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलणार, नवी मूर्ती बसविणार, अशा चर्चेचा खडा आपणच टाकायचा आणि उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या की आपणच इन्कार करायचा, अशा स्वरूपाचा विचित्र खेळ अंबाबाईच्या मूर्तीसंदर्भात सुरू झाला आहे. अशा चर्चेचे भाविकांवर काय परिणाम होतात, याचा विचार न करता काही कालावधीनंतर अशी चर्चा काही जण मुद्दाम सुरू करतात आणि नंतर हळूच बाजूला जातात, असा गेल्या दोन-तीन वर्षांतला अनुभव आहे. यामागे वरवर एखाद-दुसरी व्यक्ती दिसत असली तरी एक यंत्रणाच त्यासाठी कार्यरत असल्याची चर्चा आहे.

खरोखरच मूर्ती बदलण्याची गरज असेल तर होय, आम्ही मूर्ती बदलणार आहोत किंवा मूर्ती बदलण्याची गरज नसेल तर कोणत्याही परिस्थितीत मूर्ती बदलली जाणार नाही, अशा स्वरूपाची नेमकी भूमिका मूर्तीबाबत घेण्याची या क्षणी गरज आहे. खडा टाकायचा आणि लांब बसून अंदाज घ्यायचा, या प्रकारामुळे अंबाबाईची मूर्ती हा विनाकारण चर्चेचा विषय ठरत आहे आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या मूर्तीबद्दलची अधूनमधून चर्चा होत राहणे भाविकांना वेदना देणारे आहे.

वर्षानुवर्षे पूजा विधी होत असलेली मूर्ती बदलणे, यात फार नवीन असे काही नाही किंवा असे कोठेही झालेले नाही, असेही नाही. त्यामुळे क्षणभर अंबाबाईची नवीन मूर्ती बसवायची असेल तर त्या विषयातल्या एखाद्या तज्ज्ञाने, एखाद्या समितीने, पुरातत्त्व विभागाने किंवा देवस्थान समितीने तसे सांगणे आवश्‍यक आहे. मूर्ती बदलणे आवश्‍यकच असेल तर तो निर्णय त्या-त्या परिस्थितीत योग्य ठरणार आहे, असे कोणीतरी म्हणणेही आवश्‍यक आहे. प्रत्यक्षात असे उघडपणे कोणी म्हणत नाही.

चार-पाच महिन्यांनी पुन्हा तेच !
मूर्ती बदलणे आवश्‍यक आहे, असे काहींना म्हणायचे आहे. पण, त्यांचे तसे म्हणण्याचे धाडस नाही. त्यातले काही जण अधूनमधून अंबाबाईची मूर्ती बदलणार, असा चर्चेचा खडा टाकत आहेत. आपण थेट पुढे न येता याला पत्रक काढायला लाव, त्याला पत्रक काढायला लाव, असले उद्योग करीत आहेत. हा प्रकारच चुकीचा आहे. कोणाच्या आड कोणीतरी दडून असली चर्चा घडवून आणत आहे. लोकांतून अशी चर्चा सुरू झाली की मग आपण या विषयाला हात घातला, असे दाखविण्याची काहींची सावध भूमिका त्यामागे आहे. पण, या साऱ्यात अंबाबाईच्या मूर्तीबद्दल मात्र विनाकारण चर्चा होत आहे. चार-पाच महिन्यांनंतर हीच चर्चा पुन्हा नव्याने, असा हा प्रकार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change in Shri Karveer Nivasini Ambabai idol issue