कास पर्यटकांच्या मार्गात बदल 

शैलेन्द्र पाटील
शुक्रवार, 6 जुलै 2018

सातारा - निसर्गरम्य कासच्या फुलांचा हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गुजरात, तसेच मुंबई- पुणे बाजूकडून कासला येणाऱ्या पर्यटकांना आता सातारा शहरातील वाहतुकीच्या कटकटीला तोंड द्यावे लागणार नाही. महामार्गावरून पर्यटकांची वाहने पाचवड-कुडाळ-मेढा-कुसुंबीमार्गे जावळी तालुक्‍यातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत कासला जाणार आहेत. वनविभागाने यंदाच्या हंगामात तसे नियोजन केले आहे. 

सातारा - निसर्गरम्य कासच्या फुलांचा हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गुजरात, तसेच मुंबई- पुणे बाजूकडून कासला येणाऱ्या पर्यटकांना आता सातारा शहरातील वाहतुकीच्या कटकटीला तोंड द्यावे लागणार नाही. महामार्गावरून पर्यटकांची वाहने पाचवड-कुडाळ-मेढा-कुसुंबीमार्गे जावळी तालुक्‍यातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत कासला जाणार आहेत. वनविभागाने यंदाच्या हंगामात तसे नियोजन केले आहे. 

सातारा शहरातील वाहतूक पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे इतर अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. हे रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यावर पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ वाढल्यास शहरातील वाहतूक कोलमडेल, यंत्रणेवर ताण पडेल. शिवाय कोंडीमुळे पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल. हे टाळण्यासाठी वन विभागाने आतापासूनच तयारी केली आहे. साताऱ्याजवळ, यवतेश्‍वर घाटात आजच रस्ता खचण्याची घटना घडली आहे. त्यामुळे सातारा शहर व यवतेश्‍वर घाटाला पाचवड, मेढामार्गे कास हा रस्ता बायपास ठरेल. मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या पर्यटकांचे सुमारे दहा किलोमीटरचे अंतर व वेळही वाचणार आहे. "विकेंड'ला महाबळेश्‍वरला येणारे पर्यटक मेढ्यातून कास अथवा कासमधून मेढामार्गे महाबळेश्‍वर असे जोडून "डेस्टिनेशन' करू शकतात. 

जागतिक निसर्ग वारसा असलेल्या कास पठाराला ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या फुलांच्या मोसमात काही लाख पर्यटक भेट देतात. यामध्ये गुजरात, तसेच मुंबई-पुण्याच्या पर्यटकांची संख्या मोठी असते. या पर्यटकांना कासला जायचे झाल्यास महामार्गावरून साताऱ्यात येण्याची गरज भासणार नाही. ते पाचवडवरून कुडाळ- मेढा- कुसुंबी- एकीवमार्गे कास रस्त्यावर येतील. नंतर एकीवफाटा ते पठाराच्या पायथ्यास, घाटाईफाट्यावर पार्किंगपर्यंत पर्यटकांची वाहने जातील, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

याहीवर्षी 100 रुपये पर्यावरण शुल्क असेल. 12 वर्षांखालील मुले, तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना आवश्‍यक पुरावा तपासून शुल्क माफ असेल. शनिवार-रविवारी व शासकीय सुटीच्या दिवशी ऑनलाइन बुकिंगशिवाय प्रवेश मिळणार नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

""जावळी तालुक्‍यातील निसर्गाचा आनंद घेत पर्यटक कासला जाऊ शकतील. या मार्गामुळे अंतर वाचेल. शिवाय मेढ्यातून महाबळेश्‍वरलाही जाता येईल. लवकरच या मार्गावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात येतील.'' 
- सचिन डोंबाळे  वनक्षेत्रपाल, मेढा, सातारा. 

Web Title: Changes in the way of Kas tourists