गणेशोत्सव मंडळांना दिलासा!; तासातच मिळणार धर्मादाय विभागाचा परवाना 

अशोक मुरुमकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आल्याने मंडळांची जशी तयारी सुरू आहे. तशीच पोलिस आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाचीही जोरदार तयारी सुरू आहे. मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांचा परवाना आवश्‍यक असतो.

सोलापूर : यावर्षी गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून लागणाऱ्या परवान्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे कमी होणार आहेत. अर्जाची पूर्तता केल्यास संबंधितांना तासातच परवाना दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे परवाना अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. 

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आल्याने मंडळांची जशी तयारी सुरू आहे. तशीच पोलिस आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाचीही जोरदार तयारी सुरू आहे. मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांचा परवाना आवश्‍यक असतो. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे आवश्‍यक असते. जी मंडळे नोंदणीकृत आहेत. त्यांना वर्गणी जमा करण्यासाठी परवान्याची आवश्‍यकता नसते, मात्र ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांना वर्गणीसाठी परवाना घ्यावा लागतो. या परवान्यासाठी ग्रामीण भागातील मंडळांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागतात. मंडळांची ही गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर येथील सहायक धर्मादाय उपायुक्त राजेश एम. परदेशी यांनी तासातच परवाना देण्याचा मानस 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केला आहे. गणेशोत्सव जसा जवळ येतो तशी मंडळांची परवान्यासाठी गर्दी होते. त्यामुळे आतापासूनच अर्ज करण्यास सुरवात करावी असे, आवाहनही त्यांनी केले आहे. 

परदेशी म्हणाले, मंडळांनी परवाना अर्ज करताना अध्यक्ष व सचिव यांचे पॅनकार्डसह आधार, निवडणूक किंवा वाहनचालक परवाना याची प्रत जोडणे आवश्‍यक आहे. याशिवाय गेल्या वर्षीचा हिशेब व यावर्षीचे अंदाजपत्रक, कार्यालयाकडून देण्यात आलेल्या परवानगीची छायांकित प्रत आवश्‍यक आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, यावर्षी नव्याने गणेशोत्सव साजरा करीत असलेल्या नगरपालिका हद्दीतील मंडळाने त्याच्या भागातील नगरसेवकाची शिफारस, ग्रामीण भागातील मंडळ असल्यास ग्रामपंचायतीची शिफारस आवश्‍यक आहे. 

पैशाची मागणी केल्यास... 
गणेशोत्सव मंडळांना परवाना मिळण्यासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून योग्य ती दक्षता घेतली जात आहे. अर्ज करतेवेळी कार्यालयात कोणी पैशाची मागणी केली तर थेट आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन परदेशी यांनी केले आहे. याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिस ठाण्यामार्फत परवानगी देतेवेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा परवाना आवश्‍यक करण्याबाबत पोलिस आयुक्तांना पत्रही दिले आहे.

Web Title: Charity Departments license will be available in the hour to Ganeshotsav Mandals