छत्रपती राजाराम महाराजांचे कोल्हापूर विमानतळाला नाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली. 

याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर, लॉजेिस्टक पार्क करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राजर्षी शाहू महाराज आणि राजाराम महाराजांच्या कार्याचा आढावा घेणारे वस्तुसंग्रहालय करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. टर्मिनल बिल्डिंग आणि एटीसी टॉवरच्या पायाभरणीच्या कोनशिलेचेही अनावरणही त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली. 

याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर, लॉजेिस्टक पार्क करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राजर्षी शाहू महाराज आणि राजाराम महाराजांच्या कार्याचा आढावा घेणारे वस्तुसंग्रहालय करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. टर्मिनल बिल्डिंग आणि एटीसी टॉवरच्या पायाभरणीच्या कोनशिलेचेही अनावरणही त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

उजळाईवाडी विमानतळाच्या प्रांगणात कार्यक्रम झाला. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर सरिता मोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, खासदार राजू शेट्टी, खासदार संजय पाटील, आमदार अमल महाडिक, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह आमदार उपस्थित होते. यापूर्वी राज्य शासनाने या नावाला मंजुरी दिली होती. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव होता. त्यामुळे प्रभू यांनी नामकरणाची घोषणा करून शिक्कामोर्तब केले. 

ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती राजाराम महाराज यांनी विमानतळ सुरू केले. यावरून त्यांची दूरदृष्टी दिसते. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारतर्फे त्यांचे नाव विमानतळाला देत असल्याचे मी जाहीर करतो.’’ ते म्हणाले, ‘‘देशात पहिल्यांदाच मोदी यांनी कृषीमाल निर्यातीसाठी स्वतंत्र धोरण आखले. या अंतर्गत साखर, भाजीपाला, फळे, मासे आणि मीठ यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येते. कृषी आणि औद्योगिक उत्पादनांच्या हवाई वाहतुकीसाठी स्वतंत्र विभाग बनविला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कृषीमाल निर्यातीसाठी मुंबई, दिल्लीच्या विमानतळावर कमी कालावधीत पोचावा, यासाठी लवकरच कोल्हापूरच्या विमानतळावरून कृषिमालाची हवाई वाहतूक सुरू होईल. त्या दृष्टिकोनातून येथील धावपट्टी व अन्य सुविधांची उभारणी केली जात आहे. विमानतळासाठी आणखी जागा मिळाल्यास येथे विमानांचे पार्किंग आणि सर्व्हिसिंगही होऊ शकते. त्यातून कोल्हापुरातून अन्य शहरांत विमानसेवा सुरू करता येईल. स्थानिक रोजगारही वाढेल.’’ 

विस्तारलेल्या विमान सेवेबाबत ते म्हणाले, ‘‘देशात १०१ विमानतळ आहेत. उडाण योजनेंतर्गत त्यातील काही विमातळांचे अत्याधुनिकीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. गुवाहाटी येथे आंतराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले असून, तेथून पूर्व आशियाई देशांमध्ये प्रवासी वाहतूक सुरू आहे. पाण्यावरही विमान उतरविण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने अंदमानसह अन्य काही ठिकाणी तशा सुविधा उभारल्या जात आहेत.’’ 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून दळणवळणाची गती वाढली आहे. त्याचा फायदा कृषी, औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीला होतो. खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नातून कवठेमहांकाळ येथे ड्रायपोर्ट विकसित होत आहे. त्यामुळे निर्यात मालाची वाहतूक गतीने होईल. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्‍न बरेच दिवस प्रलंबित होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राज्य सरकारच्या हिश्‍शाचा ३० टक्के निधी मंजूर करून दिला. विमानतळाच्या आत महिला बचतगटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतील. त्याद्वारे कोल्हापूरच्या वस्तू आणि पदार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात जातील.’’  

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत विमानतळ सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्या वचनपूर्तीचा आनंद मिळाला. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला गती दिली. त्यामुळेच हे होऊ शकले. नाईट लॅंडिंगही लवकरच सुरू होईल.’’

खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘‘येथून दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद येथेही विमानसेवा सुरू करावी. नाईट लॅंडिंग सुरू झाल्यास विमान कंपन्यांनाही अधिक व्यवसाय मिळेल.’’ खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘कोल्हापूरकरांकडे पैसे आहेत; पण त्यांच्या खिशातील पैसे काढून घेणे एवढे सोपे नाही. तुम्ही त्यांना सुविधा द्या, ते पैसे खर्च करतील. म्हणूनच मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी सकाळी व सायंकाळी विमानसेवा सुरू करावी. प्रवाशांबरोबरच आम्हा खासदारांनाही अधिवेशन आणि मतदारसंघातील कामे एकाच वेळी करता येतील.’ 

एअरपोर्ट ॲथॉरिटीचे कार्यकारी संचालक एन. के. शुक्‍ला यांनी प्रास्ताविकात सुविधांबाबतची माहिती दिली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विविध औद्योगिक आणि व्यापारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिष्टमंडळाने मानले प्रभू यांचे आभार
विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केली. यापूर्वी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत ललित गांधी यांच्यासह इतरांनी पाठपुरावा केला होता. आज याची घोषणा मंत्री सुरेश प्रभू यांनी केल्याबद्दल त्यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे श्री. गांधी व शिष्टमंडळाने आभार मानले. रमेश कारवेकर, रणजित पारेख, राजेंद्र शहा, अतुल लोंढे, आशिष पाटुकले, स्नेहल मगदूम आदी उपस्थित होते. 

दहा वर्षे सतत पाठपुरावा
दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोल्हापूरची विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी दहा वर्षांपासून अधिक काळ आपण प्रयत्न केला आहे. २००७ मध्ये तत्कालीन उद्योगमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. याचवेळी विस्तारित भूसंपादनाच्या विषयातील वाद मिटवून २००९ मध्ये निधी वाटपही केला. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे विमानतळ विस्तारीकरण व भूसंपादनासाठी लागणारे ८० कोटी व अतिरिक्त खर्चास शासनाने मंजुरी द्यावी, यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याच्या आधारे शासनाने विमानतळाचे विस्तारीकरण व भूसंपादन केलेल्या क्षेत्राचा पहिला हप्ता म्हणून ३० कोटींचा पहिला हप्ता ३ जून २०१० ला मंजूर केला.  वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विमानसेवा सुरू झाली आहे. यापुढील काळातही ती अखंडित सुरू राहावी, तसेच मुंबई विमानसेवा लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. जाहीर केल्याप्रमाणे नाईट लॅंडिंगचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chatrapati Rajaram Maharaj Airport Kolhapur Suresh Prabhu