चव्हाण बंधूंवर होते कोटीचे कर्ज 

चव्हाण बंधूंवर होते कोटीचे कर्ज 

कऱ्हाड - वडगाव हवेली येथील आत्महत्या केलेल्या सख्ख्या भावांनी दोन बॅंकांशिवाय खासगी लोकांकडूनही कर्ज उचलले होते. त्यांच्या कर्जाचा आकडा एक कोटी दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यांनी कर्जाच्या तगाद्याला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे. त्याबाबत त्यांच्या नातेवाईकांचे जबाब पोलिसांनी आज नोंदवले. त्यातही वरील कर्जांचा उल्लेख आहे. बॅंकांशिवाय ज्या लोकांकडून त्यांनी पैसे उचलेले होते, अशांची नावे पोलिसांकडे आली आहेत. त्यांच्याकडे चौकशी होणार आहे. त्याशिवाय संबंधित दोन बॅंकाचेही जबाब नोंदवले जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी आज दिली. 

वडगाव हवेली येथील विजय कृष्णा चव्हाण व जगन्नाथ कृष्णा चव्हाण यांनी परवा रात्री अवघ्या तासाच्या फरकाने आत्महत्या केली. त्यात विजय यांनी विषारी औषध प्यायले, तर जगन्नाथ यांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन जीवन संपवले. दोघांनी शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी काढलेले कर्ज थकीत झाल्यानेच आत्महत्या केल्याची तक्रार नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे. प्रांताधिकारी किशोर पवार यांना त्यांनी त्या आशयाचे निवदेन दिले आहे. त्यात दोन्ही बॅंकांच्या नावाचा उल्लेख आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी आज सविस्तर चौकशी केली. त्या वेळी दोन्ही बॅंकांचे मिळून 75 लाखांचे कर्ज थकीत असल्याची माहिती तपासात आली आहे. त्याबाबत संबंधित बॅंकांकडे मागणी करून त्यांचा खाते उतारा घेण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक मांजरे यांनी सांगितले. दोन्ही बॅंकाशिवाय त्यांनी काही खासगी लोकांकडूनही पैसे उचलले होते. त्याचा आकडा 28 लाखांवर आहे. त्यात त्यांच्या वडगावातून किमान तीन लाख रुपये ऊसणवारीवर घेतले आहेत. शहरातील एकाकडून त्यांनी 25 लाख रुपये घेतले आहेत, असे हात ऊसणे घेतलेल्यांची यादी अकरावर गेली आहे. त्यांचाही सविस्तर तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही भावांनी कर्ज परत फेडीच्या तगाद्याच्या तणावाखालीच आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे. विजय व जगन्नाथ यांच्या जवळच्या लोकांसह त्यांच्या नातेवाईकांचे जबाब आज नोंदवले. 

पश्‍चिम बंगालपर्यंत कसे पोचले? 
जगन्नाथ यांच्या कर्जाला त्यांचे एक नातेवाईक सहकर्जदार आहेत. त्यांनाही उद्या (गुरुवारी) बोलवण्यात आले आहे. त्यांचाही याबाबत जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतरही काही गोष्टी स्पष्ट होतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांना पश्‍चिम बंगालच्या फायनान्स कंपनीने फसवले आहे. त्याचीही माहिती पुढे येत आहे. मात्र त्या कंपनीची व्यक्ती जगन्नाथपर्यंत कशी पोचली, याची धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com