गडबडीत बदलले एटीएम कार्ड! अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
12.21 AM

रुग्णालयात जायचे असल्याने आणि रात्र झाल्याने अनिल यांनी मेसेजकडे दुर्लक्ष केले. परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या बॅंक खात्यातून एक हजार 300 रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला.

सोलापूर : पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीने हातचलाखी करून एटीएम कार्ड बदलून पैसे काढून घेतल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्या आहेत. 

एटीएम मशिनला हात लावला 
पहिली घटना :
अनिल भीमाशंकर जाधव (वय 44, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल जाधव यांच्या पुतण्यास आसरा चौक परिसरातील चिरायू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर तो बरा झाल्याने त्याला घरी नेण्यास डॉक्‍टरांनी सांगितले होते. रुग्णालयात भरण्यासाठी पैसे लागणार असल्याने अनिल हे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आसरा चौक येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये गेले. त्यावेळी एटीएम सेंटरमध्ये लोकांची रांग होती. अनिल हे पैसे काढण्यासाठी पुढे गेले तेव्हा त्यांच्या पाठीमागे एक व्यक्ती होता. अनिल यांनी 10 हजार रुपये काढले. त्यानंतर पुन्हा पैसे काढण्यासाठी त्यांनी एटीएम कार्डचा वापर केला. त्यावेळी मागे थांबलेल्या व्यक्तीने एटीएम मशिनला हात लावला. अनिल यांनी हटकल्यानंतर हात काढला. या दरम्यान कार्ड बदलेले असण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : धरणात आढळला चक्क पाण्यावर तरंगणारा दगड

बॅंक खाते बंद करण्यासाठी केला अर्ज
मशिनमधून पैसे निघत नसल्याने तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज घ्यावयाचा असल्याने अनिल हे तसेच रुग्णालयाकडे निघून गेले. काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर बॅंकेतून पैसे काढण्याचा मेसेज आला. त्यामध्ये दोन टप्प्यात खात्यातून 20 हजार रुपये काढले होते. रुग्णालयात जायचे असल्याने आणि रात्र झाल्याने अनिल यांनी मेसेजकडे दुर्लक्ष केले. परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या बॅंक खात्यातून एक हजार 300 रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर त्यांनी बॅंकेशी संपर्क साधून बॅंक खाते बंद करण्यासाठी अर्ज केला. परंतु दरम्यानच्या काळात त्यांच्या खात्यातून 21 हजार 300 रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : एसबीआय बँकेला आग, एटीएम जळून खाक

एटीएम कार्ड बदलून काढले 40 हजार
दुसरी घटना :  एटीएम कार्ड बदलून अंबाजी महादेव माळी (वय 24, रा. लवंगी, ता. दक्षिण सोलापूर) या तरुणाच्या खात्यातून 40 हजार रुपये काढून घेतले आहेत. याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजी हे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता सात रस्ता परिसरातील एटीएम सेंटरवर गेले होते. एटीएम मशिनमधून पैसे निघाले नसल्याने त्यांनी सीडीएम मशिनमधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मशिनवर ठेवलेले त्यांचे कार्ड पाठीमागे थांबलेल्या दोघांनी चोरले आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडील एटीएम कार्ड ठेवले. दरम्यान एटीएम मशिनमधून पैसे न निघाल्याने अंबाजी तिथून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी मशिनजवळ असलेले कार्ड स्वतःचे समजून आपल्या खिशात ठेवले. काही वेळाने त्यांच्या खात्यातून 20 हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला. परंतु बॅंकेकडून चुकून झाले असेल असे समजून अंबाजी घरी गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन वेळा प्रत्येकी 10 हजार काढल्याचा मेसेज आला. त्यावेळी अंबाजी यांनी त्यांचे एटीएम कार्ड पाहिले. त्यावर किरण विश्‍वनाथ पांढरी असे नाव लिहिलेले दिसले. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating by changing ATM card